जिल्ह्यातील दिव्यांगांना नि:शुल्क उपकरणांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:49 AM2021-02-25T04:49:21+5:302021-02-25T04:49:21+5:30
गडचिरोली : विविध प्रकारच्या शारीरिक अपंगत्वामुळे दैनंदिन कार्य करण्यास अडचणी जात असणाऱ्या दिव्यांगांना बुधवारी (दि.२४) विविध उपकरणांचे नि:शुल्क वाटप ...
गडचिरोली : विविध प्रकारच्या शारीरिक अपंगत्वामुळे दैनंदिन कार्य करण्यास अडचणी जात असणाऱ्या दिव्यांगांना बुधवारी (दि.२४) विविध उपकरणांचे नि:शुल्क वाटप करण्यात आले. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या वतीने एडिप योजनेअंतर्गत गडचिरोलीतील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात त्यासाठी सामाजिक अधिकारिता शिबिर आयोजित केले होते.
यावेळी केंद्रिय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री थावरचंद गेहलोत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. त्यांच्या मुख्य उपस्थितीसह यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, खासदार अशोक नेते, आमदार देवराव होळी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, समाजकल्याण समिती सभापती रंजीता कोडापे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, समाजकल्याण उपायुक्त राजेश पांडे तसेच जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी एस.जी. पेंदाम यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात खासदार अशोक नेते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. ना.गेहलोत यांनी मंचावर उपस्थित मान्यवरांचे अभिनंदन करून गडचिरोली जिल्ह्यात होत असलेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. दिव्यांगांना आवश्यक असणाऱ्या साहित्याचे वाटप केल्यामुळे ते समाजाच्या मुख्य धारेमध्ये येण्यास सक्षम होतील. दिव्यांगांना शासनाचे लाभ कुठेही घेता येऊ शकतात. दिव्यांग व्यक्ती हे अधिक सक्षम व स्वावलंबी होतील यासाठी शासनाचे प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. एडिप योजनेअंतर्गत आधुनिक उपकरण तयार करण्यात आले असून ते देण्यात येत आहे. त्यामुळे ते अधिक सक्षमपणे कार्य करतील.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त तसेच आदिवासी जिल्हा असून जिल्ह्यातील दिव्यांगांना नि:शुल्क साहित्य पुरविल्याबद्दल त्यांनी शासनाचे अभिनंदन केले. तसेच नि:शुल्क साहित्याचे वाटप केल्यामुळे दिव्यांगांना समाजात मुख्य प्रवाहात येणे शक्य होईल असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.नरेंद्र आरेकर यांनी तर सतीश किनारकर यांनी मान्यवरांचे भाषण सांकेतिक भाषेमध्ये रुपांतरित केले.
(बॉक्स)
तालुकास्तरावर होणार साहित्याचे वाटप
यावेळी खासदार अशोक नेते यांनी दिव्यांगांना होत असलेल्या साहित्य वाटपाबद्दल समाधान व्यक्त करून या कार्यक्रमात कोरोनाकाळामुळे सर्वांना बोलावणे शक्य झाले नाही, पण तालुकास्तरावर यापुढे अशाच प्रकारे दिव्यांगांना नि:शुल्क साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी विविध १५ दिव्यांगांना तीनचाकी सायकल, कानाची मशीन, व्हिल चेअर, एमएसआयईडी किट, डेजी प्लेअर, स्मार्ट केन अशा साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. काही जण कार्यक्रमात पोहोचू शकले नाही. एकूण ५० जणांना साहित्य वाटप करण्याचे नियोजन होते.