१६२ लाभार्थ्यांना गॅसचे वितरण
By admin | Published: May 8, 2016 01:15 AM2016-05-08T01:15:06+5:302016-05-08T01:15:06+5:30
पर्यावरण संतुलीत राहावे, जंगलतोड होऊ नये, तसेच नागरिकांचा जंगलावरील भार कमी व्हावा, या उद्देशाने अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने
जंगलतोडीच्या दुष्परिणामावर मार्गदर्शन : जिमलगट्टा वन परिक्षेत्र कार्यालयाचा पुढाकार
जिमलगट्टा : पर्यावरण संतुलीत राहावे, जंगलतोड होऊ नये, तसेच नागरिकांचा जंगलावरील भार कमी व्हावा, या उद्देशाने अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने परिसरातील अनुसूचित जाती व जमातीच्या एकूण १६२ लाभार्थ्यांना सवलतीवर गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव होते. प्रमुख अतिथी म्हणून जिमलगट्टाचे वन परिक्षेत्राधिकारी कुसनाके, कमलापूरचे वन परिक्षेत्राधिकारी लाड, भाजपचे पदाधिकारी रवी नेलकुद्री, पोलीस उपनिरिक्षक शशिकांत मुसळे, उपसरपंच मदना कोडापे, पुलय्या वेलादी, संतोष येलमुलवार आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी वनपरिक्षेधिकारी कुसनाके यांनी जंगलतोडीचे मानवावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगितले. तसेच गॅस सिलिंडर मिळालेल्या लाभार्थ्यांनी याचा पुरेपूर वापर करून परिसरात जंगलतोड करू नये, असे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन पी. जी. देशपांडे यांनी केले तर आभार एस. एस. बाला यांनी मानले. यशस्वीतेसाठी वनपाल नैताम, कन्नाके, घागरगुडे, चौके यांनी सहकार्य केले. जिमलगट्टा, येदरंगा, रसपल्ली, गुंडेरा, अर्कापल्ली, मरपल्ली, सुध्दागुडम, उमानूर, जोगनगुडा, गोविंदगाव येथील एससी, एसटी प्रवर्गातील लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचा लाभ यावेळी देण्यात आला. वन विभागाच्या वतीने पाच वर्षांपासून गॅस सिलिंडर वाटपाचा जम्बो कार्यक्रम राबविला जात आहे. मात्र वन विभागामार्फत गॅस रिफिलिंगची व्यवस्था दूरवर करण्यात आल्याने लाभार्थी अडचणीत आहेत.