जिल्ह्यात पुन्हा मुसळधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 12:05 AM2019-08-03T00:05:07+5:302019-08-03T00:05:36+5:30
गुरूवारी रात्रीपासून जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे पुन्हा नदी, नाल्यांना पूर येण्यास सुरूवात झाली आहे. शुक्रवारी सकाळी भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला. रात्री शहरात पाणी शिरण्यास सुरूवात झाल्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गुरूवारी रात्रीपासून जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे पुन्हा नदी, नाल्यांना पूर येण्यास सुरूवात झाली आहे. शुक्रवारी सकाळी भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला. रात्री शहरात पाणी शिरण्यास सुरूवात झाल्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली आहे. बुधवारी व गुरूवारी दुपारी पावसाचा जोर ओसरला होता. त्यामुळे नदी, नाल्यांच्या पाण्याची पातळी कमी झाली होती. मात्र पुन्हा गुरूवारी रात्रीपासून काही ठिकाणी संततधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदी नाल्यांची पातळी वाढण्यास सुरूवात झाली आहे. शुक्रवारी दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. सतत पाऊस सुरू असल्याने रोवण्याच्या कामांवरही परिणाम झाला आहे. आलापल्ली-भामरागड मार्गावरील कुमरगुडा नाल्याच्या पुलावर पूर वाहण्यास सुरूवात झाल्याने आलापल्ली-भामरागड मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. वैनगंगा नदी व तिच्या उपनद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. सततच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
वीज पडून तीन महिला जखमी
देसाईगंज : रोवणीची काम करीत असताना वीज पडल्याने आमगाव येथील तीन महिला जखमी झाल्या. दुसऱ्या एका घटनेत देसाईगंज येथील दोन म्हशी ठार झाल्या. सुनिता मोहन चौधरी (३०), शकुंतला श्रावण चौधरी (५५), विशाखा महेश निकोडे सर्व रा. आमगाव अशी जखमींची नावे आहेत. आमागाव येथील महेश रामजी निकोडे यांच्या शेतात रोवणीचे काम सुरू होते. शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान वीज कोसळली. यामध्ये तिघींनाही जबर झटका बसला. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रूग्णालय देसाईगंज येथे भरती करण्यात आले. पुढील उपचासाठी जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आले आहे. त्याच वेळेला देसाईगंज येथील हनुमान वार्डातील रहिवासी शंकर मैंद यांच्या दोन म्हशींवर वीज कोसळल्याने ठार झाल्या.