जिल्ह्यात १६ हंगामी वसतिगृह मंजूर
By admin | Published: January 6, 2017 01:30 AM2017-01-06T01:30:54+5:302017-01-06T01:30:54+5:30
रोजगारासाठी स्थलांतरीत होणाऱ्या मजुरांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सर्व शिक्षा
स्थलांतरित मजुरांच्या मुलांसाठी सुविधा : सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून कार्यक्रम
गडचिरोली : रोजगारासाठी स्थलांतरीत होणाऱ्या मजुरांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सर्व शिक्षा अभियानच्या मार्फतीने जिल्हाभरात १६ हंगामी वसतिगृह सुरू करण्यात आले आहेत. सदर वसतिगृह या सत्रातील शाळा संपेपर्यंत चालणार आहेत.
जिल्ह्यात ग्रामीण भागातील जनतेला प्रामुख्याने खरीप हंगामातच धान शेतीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होते. त्यानंतर मात्र येथील नागरिकांना रोजगारासाठी वनवन करावी लागते. त्यामुळे ज्या भागात रोजगार उपलब्ध होतो, अशा भागात गडचिरोली जिल्ह्यातील हजारो मजूर स्थलांतरीत होतात. विशेष करून अहेरी, एटापल्ली, सिरोंचा तालुक्यातील नागरिक रोजगारासाठी तेलंगणा, छत्तीसगड राज्यात जातात. विशेष करून डिसेंबर, जानेवारी महिन्यापासून मजूर रोजगारासाठी बाहेर निघतात. रोजगारासाठी जाताना ते आपल्या पाल्यालाही सोबत घेऊन जातात. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होते. ही बाब टाळण्यासाठी सर्व शिक्षा अभियानच्या मार्फतीने गडचिरोली जिल्ह्यात १६ वसतिगृह सुरू केले आहेत. स्थलांतरीत झालेल्या मुलांचे नातेवाईक गावातच राहतात. त्याचबरोबर गडचिरोलीचा परिसर नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील १६ ही वसतिगृहे अनिवासी स्वरूपाची आहेत. विद्यार्थ्यांच्या सकाळ व सायंकाळच्या जेवनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळचे जेवन झाल्यानंतर व्यवस्थापक म्हणून नेमलेले शिक्षक संबंधित विद्यार्थ्यांचा सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत अभ्यास घेतात. त्यानंतर त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी पाठविले जाते. सदर वसतिगृह त्याच गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये सुरू आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याचे नास्ता व रात्रीच्या जेवनासाठी प्रती दिन ४२ रूपये मंजूर करण्यात आले आहेत. सहा महिन्यांसाठी ७ हजार ५६० रूपये दिले जाणार आहेत. त्याचबरोबर ४० रूपयांचे लेखन साहित्य, १०० रूपयांचे आंघोळीची साबन, केसाचे तेल, कपडे धुण्याचा साबन, आरसा, कंगवा व स्वयंपाकीचे मानधन म्हणून ५०० रूपये असे एकूण प्रती विद्यार्थी सहा महिन्याचे ८ हजार २०० रूपये शाळा व्यवस्थापन समितीला दिले जाणार आहेत. (नगर प्रतिनिधी)
वसतिगृह मंजूर करण्यात आलेल्या गावांची नावे
कुरखेडा तालुक्यातील जिलहा परिषद उच्च प्राथमिक शाळा धमदीटोला, धानोरा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंदावाही, चामोर्शी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालडोंगरी, मुलचेरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा हरीनगर, अहेरी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा देवलमारी, इंदाराम, बोरी, चिंचगुंडी, राजपूर पॅच, किष्टापूर, मरपल्ली, देचलीपेठा, एटापल्ली तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पुरसलगोंदी, नेंडेर, जाजावंडी, गिलनगुडा या ठिकाणच्या शाळांमध्ये हंगामी वसतिगृह मंजूर करण्यात आले आहे. या सर्व वसतिगृहांमध्ये बायोमेट्रीक मशीन लावण्याचे काम सुरू आहे. या वसतिगृहात एकूण ६४७ विद्यार्थ्यांची सोय झाली आहे.