महसूल कर्मचाऱ्यांचे जिल्हाभर धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 10:19 PM2019-07-08T22:19:15+5:302019-07-08T22:19:39+5:30
विविध मागण्यांसाठी राज्यभरातील महसूल कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विविध मागण्यांसाठी राज्यभरातील महसूल कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले.
नागपूर विभागात अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गाची पदे परस्पर अदलाबदलीने करण्यात यावी, पुरवठा विभागातील अव्वल कारकून पदावर महसूलच्या कनिष्ठ लिपीकांना दतर्थ पदोन्नती द्यावी, महसूल कर्मचाºयांचे विनंती बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करावी, नागपूर विभागातील नायब तहसीलदारांची रिक्त पदे पदोन्नतीने भरावी, सरळ सेवा कोठ्यातील नायब तहसीलदाराची पदे दतर्थरित्या पदोन्नतीने भरावी, पदोन्नत नायब तहसीलदारांना नियमित पदांचा कार्यभार द्यावा, सेवानिवृत्त होणारे अधिकारी व कर्मचारी यांच्याबाबत ते कार्यरत असलेल्या सर्व ठिकाणाहून मागविण्यात येणाºया नाहरकत प्रमाणपत्राची अट रद्द करावी, आदी मागण्यांसाठी ८ जुलै रोजी काळ्या फिती लावून आंदोलन केले. त्यानंतर दुपारच्या सुटीत निदर्शने केली.
मागण्या मान्य न झाल्यास १० जुलै रोजी महसूल कर्मचारी सामुहिक रजेचा अर्ज सादर करून न्यायालयापुढे निदर्शने करतील. ११ व १२ जुलै रोजी लेखनी बंद ठेवून निदर्शने करतील. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास १५ जुलैपासून कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महसूल कर्मचारी संघटनेने दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यात महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान यांच्या नेतृत्वात आंदोलन केले जात आहे. तालुकास्तरावर सरचिटणीस विजय करपते, संघटक अल्पेश बारापात्रे, गौरीशंकर ढेंगे, कोषाध्यक्ष विशाल खरतडे, कार्याध्यक्ष वनिशाम येरमे, महिला प्रतिनिधी अर्चना वडेट्टीवार, सोनाली कंकलवार यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले.
विभागीय आयुक्तांनी चर्चेला बोलाविले
कर्मचाऱ्यांच्या निदर्शन आंदोलनाची दखल घेत विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी संघटनेच्या पदाधिकाºयांना चर्चेसाठी बोलाविले आहे. या चर्चेदरम्यान महसूल कर्मचाºयांच्या संपूर्ण मागण्या मान्य व्हाव्या, अशी अपेक्षा आहे. काही मागण्या प्रलंबित राहिल्यास आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचा इशारा महसूल कर्मचारी संघटनेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान यांनी दिला आहे.