सिरोंचातील रेती तस्करीस जिल्हाधिकारीच जबाबदार
By admin | Published: November 8, 2016 01:16 AM2016-11-08T01:16:10+5:302016-11-08T01:16:10+5:30
सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून दर दिवशी २०० ते २५० ट्रक रेतीची तस्करी केली जात
विजय वडेट्टीवार यांचा आरोप : पत्रकार परिषदेत माहिती; कारवाईची मागणी
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून दर दिवशी २०० ते २५० ट्रक रेतीची तस्करी केली जात आहे. पोकलँड, जेसीबीच्या सहाय्याने रेतीचे उत्खनन केले जात आहे. रेती तस्करांकडून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाखो रूपये घेतले असून यामध्ये जिल्हाधिकारी यांचाही सहभाग आहे, असा आरोप काँग्रेसचे विधानसभेतील उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदी पात्रातील जवळपास ११ रेती घाटांचा लिलाव करण्यात आला आहे. या सर्व रेती घाटांचे कंत्राट तेलंगणातील कंत्राटदारांना मिळाले आहे. तीन ब्रॉसच्या टीपीवर सात ब्रॉस टीपीची वाहतूक केली जात आहे. अवैधरितीने पोकलँड, जेसीबी लावून उत्खनन केले जात आहे. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी मूळचे तेलंगणा राज्यातील असल्याने रेती तस्करांना पाठींबा मिळत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने दर दिवशी शेकडो ट्रक रेतीची तस्करी केली जात आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाचा दर दिवशी लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे. रेतीची तस्करी सुरू असतानाही गडचिरोलीचे जिल्हाधिकारी केवळ बघ्याची भूमिका निभावित आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यपध्दतीवरही शंका उपस्थित होत आहेत.
सद्य:स्थितीत गोदावरी नदीतील पाण्याचा प्रवाह तेलंगणाच्या बाजुला आहे. मात्र सातत्याने रेतीचा उपसा होण्यामुळे हा प्रवाह सिरोंचाच्या बाजुने वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास सिरोंचा तालुक्यातील १० ते १२ गावांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. या संदर्भात महसूल मंत्री व प्रधान सचिव यांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जिल्हाधिकारी व महसूल विभागातील जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत. कारवाई न झाल्यास हिवाळी अधिवेशनात या मुद्यावर आपण रान उठवू, असा इशारा सुध्दा दिला आहे. शासनाची होणारी नुकसान भरपाई संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करावी, अशीही मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. सिरोंचातील नायब तहसीलदार कडार्लावार यांचे कुरखेडा येथे स्थानांतरण झाले होते. मात्र रेती तस्करीत मध्यस्थी करण्यात त्यांचा हातखंडा असल्याने त्यांना पुन्हा सिरोंचा येथे पाठविण्यात आले. कडार्लावार हे मागील २० वर्षांपासून सिरोंचा येथेच कार्यरत आहेत. कडार्लावार यांनाही जिल्हाधिकाऱ्यांचेच पाठबळ आहे, असा आरोप आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. (नगर प्रतिनिधी)
सुरजागडबाबत लोकप्रतिनिधी गप्प का?
४पालकमंत्री, खासदार, आमदारांनी गडचिरोली जिल्ह्यातच लोहखनिज प्रकल्प निर्माण केला जाईल. लोहखनिजाची इतर जिल्ह्यांमध्ये वाहतूक करू दिली जाणार नाही. लोहखनिज प्रकल्प न उभारता दुसऱ्या जिल्ह्यात लोहखनिज नेल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र प्रत्यक्षात आता लोहखनिजाची वाहतूक केली जात आहे. दर दिवशी २०० ट्रक लोहखनिज वाहतूक होत आहे. लोहखनिजाची वाहतूक थांबविण्यासाठी जे नागरिक आंदोलन करीत आहेत. त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले जात आहेत. हे सर्व होत असताना येथील लोकप्रतिनिधी मात्र आता गप्प आहेत. त्यांचे तोंड संबंधित कंपन्यांनी बंद केले आहेत, असाही आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या ठिकाणी कारखाना उभारला जात नसेल तर लोहखनिज नेऊ दिला जाणार नाही. यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.
४काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले आहे. याबाबत वडेट्टीवार यांना विचारले असता, नवीन ठिकाणी कार्यालय सुरू केले जाईल. चामोर्शी मार्गावरील आपल्याच इमारतीत एक गाळा या कार्यालयाला देणार आहोत, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
रेती तस्करी रोखण्यासाठी सिरोंचातील प्रशासकीय यंत्रणा सक्षम आहे. रेती तस्करी करताना आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई केली जात आहे. रेती तस्करीसोबत आपला थेट संबंध जोडणे चुकीचे आहे.
- ए. एस. आर. नायक, जिल्हाधिकारी, गडचिरोली