जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला मामा तलावांचा आढावा
By admin | Published: October 7, 2016 01:32 AM2016-10-07T01:32:01+5:302016-10-07T01:32:01+5:30
जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी अहेरी
अहेरी पं.स.ला आकस्मिक भेट
अहेरी : जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी अहेरी पंचायत समितीला गुरूवारी आकस्मिक भेट देऊन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व तालुक्यातील मामा तलावांच्या स्थितीचा आढावा घेतला.
यावेळी अहेरीचे उपविभागीय अधिकारी राममूर्ती, गट विकास अधिकारी सुनिल तडस उपस्थित होते. सर्वप्रथम मनरेगा अंतर्गत अपूर्ण असलेल्या कामांची ग्रामपंचायत निहाय यादी तयार करावी, यंत्रणास्तरावरील व ग्रामपंचायत स्तरावरील कामांचा आढावा सतत घेत राहावा, २०१४-१५ पर्यंत जी कामे अपूर्ण आहेत त्या कामांना प्राधान्य देऊन ती कामे दोन महिन्यात पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने नियोजन करावे, विशेषत: सिंचन विहिरी पूर्ण होण्यावर भर द्यावा, जॉबकार्डधारकांना आधार कार्ड काढणे सक्तीचे करावे, सदर आधार कार्ड शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करावे, असे निर्देश दिले. वनहक्क पट्टेधारकांना पंचायत समितीकडून कोणत्या योजनांचा लाभ देण्यात आला. याची सविस्तर माहिती तयार करावी, वनहक्क पट्टेधारकांचे जॉब कार्ड काढण्याची कार्यवाही सुरू करावी, तालुक्यातील मामा तलावांच्या दुरूस्तीकडे लक्ष घालावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी अहेरी पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांना दिले. (शहर प्रतिनिधी)