जिल्हाधिकाऱ्यांनी दिली हात धुण्याची प्रेरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 11:01 PM2018-10-15T23:01:12+5:302018-10-15T23:01:53+5:30
सुदृढ आरोग्यासाठी जेवणापूर्वी हात धुणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ.विजय राठोड यांनी कार्यक्रमादरम्यान स्वत: हात धुवून विद्यार्थ्यांना जेवणापूर्वी हात धुण्याची प्रेरणा दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सुदृढ आरोग्यासाठी जेवणापूर्वी हात धुणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ.विजय राठोड यांनी कार्यक्रमादरम्यान स्वत: हात धुवून विद्यार्थ्यांना जेवणापूर्वी हात धुण्याची प्रेरणा दिली.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येवली येथे वाचन प्रेरणा दिन व जागतिक हातधुवा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, डीआयईसीपीडीचे प्राचार्य तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.शरदचंद्र पाटील, येवलीच्या सरपंच सुरेखा भांडेकर, उपशिक्षणाधिकारी मारोती चलाख, विषय सहायक कुणाल कोवे, विठ्ठल होंडे, गटशिक्षणाधिकारी संगीता खोब्रागडे, केंद्रप्रमुख वनमाळी आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. वाचन प्रेरणादिनानिमित्त विद्यार्थ्यांना हात धुण्याच्या प्रात्यक्षिकाचा व्हिडीओ दाखविण्यात आला.
यावेळी हात धुण्याच्या सात पायऱ्या विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आल्या. बहुतांश विद्यार्थ्यांना जेवणापूर्वी हात धुण्याची सवय राहत नाही. परिणामी खेळताना खराब झालेल्या हातांनीच जेवण घेतले जाते. परिणामी विद्यार्थ्यांचे आरोग्य बिघडते. विद्यार्थ्यांमध्ये हात धुण्याविषयी जाणीवजागृती व्हावी, यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने १५ आॅक्टोबर रोजी हात धुणे दिन राबविण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हाभरातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढण्यास मदत झाली. यावेळी वाचन प्रेरणा दिनाचेही आयोजन करण्यात आले.