जिल्हाभर ग्राहक आर्थिक साक्षरता जनजागृती
By admin | Published: January 2, 2017 01:56 AM2017-01-02T01:56:03+5:302017-01-02T01:56:03+5:30
ग्राहकांनी रोख व्यवहार टाळून कॅशलेस व्यवहाराकडे वळावे याकरिता वित्तीय समावेशन आर्थिक साक्षरता
बँकांचा पुढाकार : धुंडेशिवणी, देसाईगंज, मार्कंडादेव येथे कार्यक्रम; आर्थिक व्यवहारांवर दिली माहिती
गडचिरोली : ग्राहकांनी रोख व्यवहार टाळून कॅशलेस व्यवहाराकडे वळावे याकरिता वित्तीय समावेशन आर्थिक साक्षरता कार्यक्रमांतर्गत नाबार्डच्या सहकार्याने विविध बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने ठिकठिकाणी वित्तीय साक्षरता जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.
गडचिरोली - तालुक्यातील धुंडेशिवणी येथे डिजीटल आर्थिक साक्षरता जनजागृतीचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी एटीएम कार्डचा वापर, आधार कार्ड बँकांना संलग्नित करणे यासह विविध माहिती देण्यात आली. दरम्यान व्यवस्थापकांच्या हस्ते एटीएम कार्डचे वितरण करण्यात आले.
देसाईगंज - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा देसाईगंजच्या वतीने ग्रामीण भागातील नागरिकांना कॅशलेस व्यवहाराबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात खातेदारांना एटीएम कार्डचे वाटप करण्यात आले. कोंढाळा, आमगाव, सावंगी, कोरेगाव येथे कॅशलेस व्यवहाराबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे. कॅशलेस व्यवहार केल्यामुळे बँकेतील येरझारा थांबतात. तसेच मोबाईलवरून वीज देयक घरच्या घरी भरता येऊ शकतो. या संदर्भात माहिती देण्यात आली. तसेच खातेदारांना एटीएम कार्डचे वाटप करण्यात आले. शाखेचे निरिक्षक छगन कुंभारे यांनी येणारा काळ हा कॅशलेस व्यवहाराचा असून ग्रामीण भागातील नागरिक देखील या व्यवहारात मागे राहणार नाही, असे सांगितले. तसेच प्रत्येकाने कॅशलेस व्यवहाराचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमाला आमगावचे सरपंच योगेश नागतोडे, कोरेगावच्या सरपंच ममीता आळे, जि.प. सदस्य पल्लवी लाडे, निकम शाखा व्यवस्थापक चंदन बटवे उपस्थित होते.
चामोर्शी - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मार्र्कंडादेव व राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक यांच्या संयुक्त विद्यमान डिजीटल वित्तीय साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन मार्र्कंडादेव येथे करण्यात आले. यावेळी एटीएम कार्डचे वितरणही करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच ललीता मरस्कोल्हे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून गंगाधर कोंडुकवार, मृत्यूंजय गायकवाड, भारतीय आभारे, साळवे, भरडकर, हरिदास जीभकाटे, जेट्टीवार उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)