जिल्हा विकासाची सदैव तळमळ राहील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2016 02:07 AM2016-10-22T02:07:48+5:302016-10-22T02:07:48+5:30
गेल्या ४० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत आपण सदैव गडचिरोली जिल्हा विकासाची तळमळ कायम ठेवली.
धर्मरावबाबा आत्राम यांचे प्रतिपादन : भगवंतराव संस्थेच्या रौप्य महोत्सवाची सांगता
गडचिरोली : गेल्या ४० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत आपण सदैव गडचिरोली जिल्हा विकासाची तळमळ कायम ठेवली. आठ तालुक्याचा जिल्हा असलेल्या गडचिरोलीत १२ तालुके करण्याचे काम आपण केले. भगवंतराव, वनवैभव व धर्मराव शिक्षण संस्थेच्या माध्यमातून १०० शैक्षणिक संस्थांचे जाळे आपण निर्माण केले. याशिवाय विविध राजकीय पक्षाच्या लोकांना शिक्षण संस्था व इतर संस्था काढण्यासाठी मदत केली. मागील १० वर्षात आपला जनसंपर्क कमी झालेला नाही. लोकांचे प्रेम आजही कायम आहे. हीच आपल्या कार्याची खरी पावती आहे. यापुढेही या शिक्षण संस्था पुढे नेण्यासाठी आपण तरूणाला लाजवेल याच पद्धतीने काम करणार आहो, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री व भगवंतराव शिक्षण संस्थेचे पदाधिकारी धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.
गुरूवारी सायंकाळी गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या प्रांगणात भगवंतराव शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला भगवंतराव शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम हलगेकर, उपाध्यक्ष दौलतराव आत्राम, माजी जि. प. उपाध्यक्ष रवींद्रबाबा आत्राम, संस्था प्रतिनिधी हर्षवर्धन धर्मरावबाबा आत्राम, भगवंतराव मेमोरियल संस्थेच्या सदस्य तनुश्री धर्मरावबाबा आत्राम, वनवैभव शिक्षण संस्थेचे व्यवस्थापक बबलू हकीम, शाहीन हकीम आदी उपस्थित होते.
याप्रसंगी भगवंतराव शिक्षण संस्थेच्या कार्याची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. चार दिवस चाललेल्या विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमातील विजेत्यांचा गौरवही धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमाला ६ हजार विद्यार्थी व अहेरी उपविभागासह गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी व राजपरिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण रौप्य महोत्सवी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन ऋतुराज हलगेकर यांनी केले. त्यांच्या नियोजनाचे धर्मरावबाबा आत्राम यांनी जाहीरपणे कौतुक केले. या कार्यक्रमाला गडचिरोलीचे माजी नगराध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, जि. प. सदस्य जगन्नाथ पाटील बोरकुटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र वासेकर, डॉ. हेमंत अप्पलवार, भाग्यवानजी खोब्रागडे, प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, यशवंत दोंतुलवार, मुतन्ना दोंतुलवार, श्रीकांत सावकार, प्रकाश ताकसांडे आदी उपस्थित होते.
यावेळी धर्मरावबाबा आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन दीर्घ आयुष्यासाठी शुभकामना दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भामरागड येथील प्राचार्य महादेव बासनवार, संचालन राकेश चडगुलवार व आभार रहीम पटेल यांनी मानले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)