जिल्ह्यात २३२ नवीन कुष्ठरुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 11:47 PM2018-10-27T23:47:33+5:302018-10-27T23:49:13+5:30
कुष्ठरोग विभागाच्या सहायक संचालक कार्यालयाकडून २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर या कालावधीत कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यात २३२ नवीन कुष्ठरुग्णांची भर पडल्याचे आढळले. अजून काही नमूने तपासायचे बाकी आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कुष्ठरोग विभागाच्या सहायक संचालक कार्यालयाकडून २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर या कालावधीत कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यात २३२ नवीन कुष्ठरुग्णांची भर पडल्याचे आढळले. अजून काही नमूने तपासायचे बाकी आहेत. सदर नमुने तपासल्यानंतर रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कुष्ठरोगावर प्रभावी उपाय शोधण्यात आले आहेत. अगदी प्राथमिक स्थितीत कुष्ठरोगावर उपचार झाल्यास विकृती टाळता येते. विशेष म्हणजे कुष्ठरोगावरील उपचार शासकीय दवाखान्यांमध्येच होत असल्याने सदर उपचार नि:शुल्क आहे. शरीरावरील पांढऱ्या रंगाचा असंवेदनशील चट्टा हा कुष्ठरोग ओळखण्याचे एकमेव लक्षण आहे. अशा प्रकारचा चट्टा आढळून आल्यास जवळपासच्या रुग्णालयात संपर्क साधण्याबाबत जनजागृती करण्यात येत असली तरी ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना याची माहिती राहत नाही. परिणामी कुष्ठरोगाचा आजार वाढत जातो.
आशा वर्कर, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्या मार्फत कुष्ठरोग शोधण्यासाठी राज्यभरात २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर यादरम्यान कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली होती. या कर्मचाºयांनी घरोघरो जाऊन प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची तपासणी केली. या तपासणी मोहिमेदरम्यान सुमारे सहा हजार संशयीत कुष्ठरुग्ण आढळून आले. त्यांचे रक्त नमूने घेण्यात आले. त्यापैकी तीन हजार नागरिकांच्या रक्त नमून्यांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये २३२ जणांना कुष्ठरोग झाल्याचे आढळून आले आहेत. अजून तीन हजार रक्त नमूने तपासयचे आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या ५०० च्या वर जाण्याची शक्यता कुष्ठरोग अधिकाºयांकडून व्यक्त केली जात आहे.
या विशेष मोहिमेशिवाय तालुकास्तरावरील कुष्ठरोग तंत्रज्ञ सुद्धा शोधमोहीम राबवित असतात. यादरम्यान एप्रिल ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत ४४० रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गडचिरोली शहरात शोधमोहीम राबवायची आहे. यासाठी ४० जणांची टीम तयार करण्यात आली आहे. २९ आॅक्टोबरपासून गडचिरोली शहरात शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.
वैनगंगा नदीलगतच्या गावांमध्ये प्रभाव
गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील जी गावे वैनगंगा नदीला लागून आहेत, अशा गावांमध्ये कुष्ठरोगींची संख्या अधिक असल्याचे दिसून येते. त्या तुलनेत जंगलव्याप्त व आदिवासीबहुल तालुक्यांमध्ये कुष्ठरोगाचे प्रमाण अतिशय कमी आहे. चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक कुष्ठरोगाचे रुग्ण आढळतात. नुकत्याच झालेल्या शोधमोहिमेदरम्यानही सुमारे ६० रुग्ण आढळून आले आहेत. वैनगंगा नदीला लागून असलेल्या गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, देसाईगंज या तालुक्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येतात.
प्रभावी उपचार उपलब्ध
कुष्ठरोगावर शासकीय रुग्णालयांमध्ये प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. पाचपेक्षा कमी चट्टे असलेल्या रुग्णाला सहा महिन्यांचा औषधोपचार दिला जातो. तर पाचपेक्षा अधिक चट्टे आढळून आल्यास १२ महिन्यांचा औषधोपचार दिला जातो. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात कुष्ठरोग रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कुष्ठरोगाबाबत गडचिरोली जिल्हा संवेदनशील मानला जातो. कुष्ठरोगाबाबत पूर्वी चुकीच्या समजुती समाजात होत्या. जनजागृतीमुळे या गैरसमजुती कमी झाल्या आहेत. त्याचबरोबर चट्ट्यांची लक्षणे आढळून आल्याबरोबर उपचार होत असल्याने विकृतीपर्यंत रुग्ण पोहोचत नाही.
कुष्ठरोगावर प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. पांढºया रंगाचा असंवेदनशील चट्टा आढळून आल्यास नागरिकांनी जवळपासची आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी, तपासणीदरम्यान कुष्ठरोग आढळून आल्यास त्यावर मोफत उपचार केले जातात. चट्ट्यांबाबत नागरिकांनी दक्ष असणे आवश्यक आहे.
- डॉ.अमित साळवे, वैद्यकीय अधिकारी,
सहायक संचालक कुष्ठरोग, गडचिरोली