जिल्ह्याला १४ कोटींचा निधी हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2017 01:26 AM2017-05-21T01:26:14+5:302017-05-21T01:26:14+5:30
सन २०१६-१७ वर्षातील रोजगार हमी योजनेच्या मंजूर कुशल व अकुशल कामांसाठी गडचिरोली जिल्ह्याच्या नरेगा विभागाला
नरेगाच्या कामासाठी : पाच महिन्यांपासून निधीचा अभाव
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सन २०१६-१७ वर्षातील रोजगार हमी योजनेच्या मंजूर कुशल व अकुशल कामांसाठी गडचिरोली जिल्ह्याच्या नरेगा विभागाला निधी नसल्याने अनेक ठिकाणची कामे रखडली आहेत. नरेगाच्या कुशल व अकुशल कामासाठी एकूण १४ कोटी ४३ लाख ७६ हजार रूपयांचा निधी आवश्यक आहे.
प्रत्येक नोंदणीकृत मजुराला १०० दिवसांचा रोजगार देण्याचे रोजगार हमी योजनेच्या कायद्याने बंधनकारक आहे. मात्र सन २०१६-१७ या वर्षात नरेगाच्या कुशल व अकुशल कामासाठी पुरेसा निधीच उपलब्ध नसल्याने गडचिरोली जिल्ह्यातील विविध कामे प्रभावित झाली आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत दरवर्षी राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद प्रशासनामार्फत नरेगाच्या कामाचा कृती आराखडा तयार केला जातो. सर्वसाधारण सभेत या आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर शासनाकडे निधीची मागणी केली जाते. सन २०१६-१७ या वर्षात कृती आराखड्यातील विविध कामांना मंजुरी प्रदान करण्यात आली. वर्षाच्या सुरूवातीला नरेगाच्या कामासाठी निधी दिला मात्र सदर निधी अल्प होता. आता गेल्या पाच महिन्यांपासून गडचिरोली जिल्हा परिषदांच्या नरेगा कक्षाकडे निधी नसल्याने नरेगाची विविध जुनी कामे रखडलेली आहेत.
सन २०१७-१८ या वर्षातील नरेगाच्या कामाला शासनाने मान्यता दिली असून याचा निधीही संबंधित यंत्रणेकडे अदा केले आहे. मात्र सन २०१६-१७ च्या कामांना निधी उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक कामे अर्धवट स्थितीत असल्याचे चित्र संपूर्ण जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. कुशल- अकुशल कामाच्या निधीअभावी रोहयोची कामे थंडबस्त्यात असल्याने मजूरही अडचणीत आले आहेत.
रोजगार हमी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सिंचन विहिर, नाडेप, गांडूळ खत निर्मिती, सिमेंट बंधारे, शेततळे, दगड पिचिंग, मजगी आदींसह विविध कामे सन २०१६-१७ वर्षात घेण्यात आले. सदर कामे सुरू आहेत. मात्र शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्याने या कामांसाठी लागणाऱ्या बांधकाम साहित्याचा संबंधित कामाच्या ठिकाणी व यंत्रणेकडे पुरवठा करणे बंद केले आहे. त्यामुळे सिंचन विहीर व इतर कामे कशी पूर्ण करावी, असा प्रश्न लाभार्थी शेतकरी तसेच यंत्रणेसमोर निर्माण झाले आहे. निधीअभावी रोहयो कामाची गती मंदावली आहे.