जिल्हा बंँकेने वाढविला ‘सहकारा’वरील विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 10:25 PM2018-11-05T22:25:44+5:302018-11-05T22:26:22+5:30
अलिकडे डबघाईस आलेल्या सहकारी बँका पाहिल्यानंतर सहकार शब्दावरचा विश्वासच उडाला होता. पण प्रतिकूल परिस्थितीतही गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांसह सर्वांना योग्य सेवा देऊन साधलेली प्रगती पाहून सहकारावरील विश्वास वाढविला, असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेता भारत गणेशपुरे यांनी काढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अलिकडे डबघाईस आलेल्या सहकारी बँका पाहिल्यानंतर सहकार शब्दावरचा विश्वासच उडाला होता. पण प्रतिकूल परिस्थितीतही गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांसह सर्वांना योग्य सेवा देऊन साधलेली प्रगती पाहून सहकारावरील विश्वास वाढविला, असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेता भारत गणेशपुरे यांनी काढले.
येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मोबाईल बँकिंग व मायक्रो एटीएम सेवेचे लोकार्पण सोमवारी गणेशपुरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार तर प्रमुख अतिथी म्हणून आ.कृष्णा गजबे, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे आणि सर्व संचालक उपस्थित होते.
यावेळी गणेशपुरे म्हणाले, जिल्हा सहकारी बँक म्हटल्यानंतर बहुतांश वेळा वयोवृद्ध मंडळीच पदाधिकारी, अधिकारी असतात. पण येथे अध्यक्षापासून मुख्य कार्यकारी अधिकाºयांपर्यंत बरेच लोक तरुण दिसत आहेत. त्यामुळेच या बँकेची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे. बँकेने खेड्यापाड्यातील शेतकरी व इतर खातेदारांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या मोबाईल बँकिंगसारख्या सुविधांचा वापर सर्वच पिढीतील लोकांनी केला पाहीजे. तंत्रज्ञान शिकलो तर हे व्यवहार अधिक सोपे वाटतील, असे ते म्हणाले.
यावेळी भारत गणेशपुरे यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरूवातीच्या काळातील किस्से सांगताना बँकांचे महत्वही उपस्थितांना सांगितले. त्या काळात कर्ज घेण्याची प्रक्रिया किती किचकट होती आणि आपण कशा पद्धतीने विविध अडचणींचा सामना केला हेसुद्धा सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्रंचित पोरेड्डीवार यांनी समाजात परिवर्तनाची सुरूवात तरुणांकडून होते. त्यामुळे बँकिंग क्षेत्रातही तंत्रज्ञानाच्या बाबतीत तरुण परिवर्तन घडवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आ.गजबे यांनी दुर्गम भागापर्यंत जिल्हा सहकारी बँकेच्या सुविधा पाहता अशी सेवा देणारी ही राज्यातील एकमेव बँक असल्याचे सांगितले.
प्रास्ताविकात सीईओ आयलवार यांनी बँकेच्या प्रगतीची माहिती दिली. बदलत्या स्पर्धेत बँकिंग क्षेत्रात अनेक बदल झाले. पण त्यात खासगी आणि राष्ट्रीयकृत बँकाच आघाडीवर होत्या. जिल्हा सहकारी बँका आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यात फारशा पुढे नसल्या तरी गडचिरोली जिल्हा सहकारी बँकेने मात्र सर्वच बाबतीत आघाडी घेतल्याचे त्यांनी सांगितले.
सुरूवातीला दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. भारत गणेशपुरे यांनी आपल्या भाषणात काही विनोद किस्से ऐकवून उपस्थितांमध्ये हशा पिकविला. कार्यक्रमासाठी बँकेचे मुख्य व्यवस्थापक अरुण निंबेकर व इतर कर्मचाºयांनी सहकार्य केले.