जिल्ह्याची आरोग्यसेवा बळकट करणार
By Admin | Published: July 18, 2016 02:07 AM2016-07-18T02:07:20+5:302016-07-18T02:07:20+5:30
गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीपासून येथील आरोग्य सेवा दुर्लक्षित आहे. येथील रूग्ण व जनता आवश्यक आरोग्य सुविधेपासून अद्यापही वंचित आहे.
पालकमंत्र्यांचे आश्वासन : अहेरीत आरोग्य शिबीर
अहेरी : गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीपासून येथील आरोग्य सेवा दुर्लक्षित आहे. येथील रूग्ण व जनता आवश्यक आरोग्य सुविधेपासून अद्यापही वंचित आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती, औषधी व इतर आवश्यक साधनांचा पुरवठा करून जिल्ह्याची आरोग्य सेवा बळकट करण्याचा प्रयत्न करणार, असे आश्वासन आदिवासी विकास, वने, राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
स्व. श्रीमंत राजे सत्यवानराव महाराज यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त वैद्यकीय विकास संघ, उपजिल्हा रूग्णालय व राजे विश्वेश्वरराव महाराज स्मारक प्रतिष्ठान अहेरीच्या संयुक्त विद्यमाने येथील धर्मराव कृषी विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर जि.प. सदस्य राजमाता रूक्मिणीदेवी, कुमार अवधेशवराव, प्रवीणराव आदी उपस्थित होते. यावेळी राजमाता रूक्मिणीदेवी यांनी स्व. राजे सत्यवानराव महाराज यांनी जे लोकांच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते, ते स्वप्न माझा मुलगा पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला. प्रास्ताविक अमोल गुड्डेलीवार, संचालन कृष्णा मंचालवार तर आभार मुकेश नामेवार यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
४०० जणांची आरोग्य तपासणी
या शिबिरात ४०० रूग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर ३६ लोकांनी रक्तदान केले. शिबिरासाठी डॉ. के. डी. मडावी, डॉ. बिश्वास, डॉ. शैलेजा मैदमवार, डॉ. सोयाम, डॉ. उमाटे, डॉ. सरोज भगत, डॉ. सत्यजीत पोतदार, डॉ. मनिष शेंडे, डॉ. दिनेश चोपडे, डॉ. प्रसन्ना मद्दिवार, डॉ. यशवंत दुर्गे, डॉ. विशाल येर्रावार, संजय उमडवार यांनी सहकार्य केले.