अखेर जिल्ह्याचे मार्केट 15 दिवसांसाठी ‘लॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 05:00 AM2021-04-15T05:00:00+5:302021-04-15T05:00:28+5:30
नागरिकांनी विनाकारण बाहेर पडून आपल्यासह इतरांचाही जीव धोक्यात घालू नये असे जिल्हाधिकारी म्हणाले. येणारे १५ दिवस जिल्ह्यातील कोरोना महामारीला थांबविण्यास पुरेसे आहेत. आपण ही संचारबंदी यशस्वी केली तर कोरोना संसर्ग निश्चितच आटोक्यात आणता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्व व्यापारी वर्गाने सहकार्य करून संचारबंदी यशस्वी करावी. प्रशासन नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणार आहेच, परंतु तशी वेळ इतर दुकानदारांनी व नागरिकांनी येऊ देऊ नये, असे जिल्हाधिकारी यांनी म्हटले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात १५ दिवस कडक संचारबंदी पाळली जाणार आहे. त्यामुळे अनेक निर्बंधानंतरही गेले दोन दिवस गजबजून गेलेली गडचिरोलीसह जिल्हाभराची बाजारपेठ आता १५ दिवसांसाठी कुलूपबंद झाली आहे.
दरम्यान, या संचारबंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्सची निर्मितीही करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेऊन संचारबंदीच्या अंमलबजावणीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना आणि निर्देश दिले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. नागरिकांनी कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले.
नागरिकांनी विनाकारण बाहेर पडून आपल्यासह इतरांचाही जीव धोक्यात घालू नये असे जिल्हाधिकारी म्हणाले. येणारे १५ दिवस जिल्ह्यातील कोरोना महामारीला थांबविण्यास पुरेसे आहेत. आपण ही संचारबंदी यशस्वी केली तर कोरोना संसर्ग निश्चितच आटोक्यात आणता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सर्व व्यापारी वर्गाने सहकार्य करून संचारबंदी यशस्वी करावी. प्रशासन नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणार आहेच, परंतु तशी वेळ इतर दुकानदारांनी व नागरिकांनी येऊ देऊ नये, असे जिल्हाधिकारी यांनी म्हटले.
नागरिकांनी केला १५ दिवसांचा साठा
१४ च्या रात्रीपासून १५ दिवस लाॅकडाऊन राहणार असल्यामुळे घराबाहेर पडता येणार नाही, या चिंतेने अनेक नागरिकांनी आवश्यक साहित्याचा साठा करून ठेवला. त्यासाठी गेल्या दाेन दिवसांपासून मार्केटमध्ये चांगलीच गर्दी उसळली हाेती. विशेष म्हणजे इतर साहित्यांसाेबत महिनाभर पुरेल एवढे किराणा सामानही नागरिकांनी घरात भरून ठेवले. वास्तविक जिवनावश्यक वस्तूमध्ये माेडणाऱ्या किराणा मालाची दुकाने लाॅकडाऊनच्या १५ दिवसांत सुरू राहणार आहेत. त्यासाठी गर्दी करण्याची गरजच नव्हती. परंतु अर्धवट माहिती आणि लाॅकडाऊन किती दिवस राहणार आणि पुढे वाढणार या भीतीने नागरिकांनी मार्केटमध्ये खरेदीसाठी घाई केल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात या अत्यावश्यक सेवा राहतील सुरू
रुग्णालये, रोगनिदान केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध विक्रेते, इतर वैद्यकीय व आरोग्य सेवा, पशुवैद्यकीय रुग्णालय, अंडी, चिकन, मांस, तसेच जनावरांचा चारा आणि या सर्व बाबींकरिता आवश्यक असलेला कच्चा माल, गोदामे, जीवनावश्यक असलेल्या पशुजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या किराणा मालाची दुकाने, भाजीपाल्याची दुकाने, दूध पुरवठा केंद्रे (दुग्धशाळा), बेकरी, मिठाईची दुकाने, खाद्यान्न दुकाने सुरू राहतील, परंतु पानठेले सुरू ठेवता येणार नाहीत.
सार्वजनिक परिवहन रेल्वे गाड्या, टॅक्सी, ऑटोरिक्षा व सार्वजनिक बस, स्थानिक प्राधिकरणांद्वारे केली जाणारी मान्सूनपूर्व (पावसाळापूर्व) कामे. स्थानिक प्राधिकरणांद्वारे पुरविल्या जाणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा, मालवाहतूक, टेलिकॉम सेवाशी संबंधित देखभाल, दुरुस्तीची कामे, पाणी पुरवठ्याशी संबंधित कामे, कृषी संबंधित सेवा आदी सुरू राहतील.
अधिस्वीकृत प्रसारमाध्यमे, पेट्रोलपंप, फळ विक्रेते, वकिलांची कार्यालये, विद्युत पुरवठ्याशी संबंधित कामे, इंधन गॅस पुरवठा, बँकांचे एमटीएम, पोस्टल सेवा, पावसाळ्यात आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या साधनसामग्रीशी संबंधित उत्पादने, आपले सरकार केंद्र/सीसीसी/सेतू केंद्र आदी सुरू राहणार आहे.