‘जनता कर्फ्यू’साठी जिल्हावासीय झाले सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 06:00 AM2020-03-22T06:00:00+5:302020-03-22T06:00:37+5:30
रविवारी जनता कर्फ्यू आणि सोमवारपासून गुरूवारपर्यंत बाजारपेठ बंद राहणार असल्यामुळे गडचिरोलीसह अनेक ठिकाणी नागरिकांनी आवश्यक साहित्यांच्या खरेदीसाठी झुंबड केली होती. त्यात भाजीपाला, किराणा दुकानात सर्वाधिक गर्दी होती. रविवारी घराबाहेर न निघण्याची नागरिकांची मानसिकता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात एकही कोरोनाबाधीत रुग्ण अजून आढळलेला नाही. तरीही प्रशासनाकडून घेतल्या जात असलेल्या आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपायांना नागरिक आणि व्यापारी वर्गाकडून सहकार्य केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी (दि.२२) कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्याकरिता ‘जनता कर्फ्यू’ पाळला जाणार असून त्यासाठी जिल्हावासीय सज्ज झाले आहेत.
दरम्यान जिल्ह्यात कोरोनाबाधित देशातून आलेल्या कुुटुंबातील २१ व्यक्तींना गृह निगराणीत (होम क्वॉरंटाईन) करून ठेवले होते. त्यातील ९ लोकांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी संशयमुक्त करत मोकळे फिरण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे १२ जण शिल्लक होते. त्यात शनिवारी आणखी एका व्यक्तीची भर पडून ही संख्या १३ झाली. दरम्यान आतापर्यंत तपासलेल्या ४ नमुन्यांपैकी एकही कोरोना पॉझिटिव्ह आला नाही. त्यामुळे स्थिती नियंत्रणात आहे.
दरम्यान रविवारी जनता कर्फ्यू आणि सोमवारपासून गुरूवारपर्यंत बाजारपेठ बंद राहणार असल्यामुळे गडचिरोलीसह अनेक ठिकाणी नागरिकांनी आवश्यक साहित्यांच्या खरेदीसाठी झुंबड केली होती. त्यात भाजीपाला, किराणा दुकानात सर्वाधिक गर्दी होती. रविवारी घराबाहेर न निघण्याची नागरिकांची मानसिकता आहे.
मोफत वाटले मास्क आणि साबण
देसाईगंज येथील नगरसेवक आणि व्यावसायिक गणेश फाफट यांनी सामाजिक जाणिवेतून देसाईगंज शहरातील सर्वसामान्य नागरिकांना मास्क आणि डेटॉल साबणांचे वाटप केले. रविवारी बंद राहणार असल्यामुळे सोमवारी पुन्हा गरजवंत लोकांना मास्क आणि हात धुण्यासाठी डेटॉल साबण वाटप केले जाईल असे त्त्यांनी सांगितले. त्यांनी २७ वेळा रक्तदान केले आहे.
ग्रामसेवकांना द्यावी लागत आहे मृतकांची माहिती
ग्रामीण भागातील खेडेगावांमध्ये मार्च महिन्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नाव, गावाचे नाव, मृत्यूचे कारण आदीसह इतर माहिती ग्रामसेवकांना पंचायत समिती प्रशासनाला कळवावी लागत आहे. याशिवाय संबंधित ग्रामपंचायतीच्या गावांमध्ये बाहेरगावावरून व जिल्ह्याच्या बाहेरून कोण व्यक्ती नातेवाईक म्हणून आली, याची नोंद ग्रामसेवक ठेवत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच ग्रामसेवक अलर्ट झाले आहेत. यासंदर्भाच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संवर्ग विकास अधिकारी व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना दिल्या आहेत.