अतिवृष्टीने जिल्हा जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 12:25 AM2019-07-31T00:25:47+5:302019-07-31T00:26:20+5:30

मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे मार्ग अडून जिल्ह्यातील दिडशेवर गावांचा संपर्क तुटला आहे. भामरागडलगत वाहणाऱ्या पर्लकोटा नदीचे नदीचे पाणी गावात शिरल्याने ३०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

The district is wet with heavy rainfall | अतिवृष्टीने जिल्हा जलमय

अतिवृष्टीने जिल्हा जलमय

Next
ठळक मुद्दे२४ तासात १२६.५ मिमी पाऊस : १० तालुके झाले जलमय, ३०० नागरिकांना हलविले

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे मार्ग अडून जिल्ह्यातील दिडशेवर गावांचा संपर्क तुटला आहे. भामरागडलगत वाहणाऱ्या पर्लकोटा नदीचे नदीचे पाणी गावात शिरल्याने ३०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. मंगळवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासात जिल्ह्यात १२६.५ मिमी पाऊस झाल्याने संपूर्ण जिल्हा जलमय झाला आहे. भामरागड व मुलचेरा तालुक्यात २४ तासात अडीचशे मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद घेण्यात आली. बांध्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याने धानाच्या रोवणीची कामे बंद पडली आहेत. ३१ जुलै रोजी सुध्दा जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

गडचिरोली-धानोरा मार्गावरील धानोरापासून पाच किमी अंतरावर असलेल्या रांजीनाला गावाजवळील मुख्य मार्गावर सागाचे झाड कोसळले. सदर झाड दुसऱ्या बाजुला लटकून होते. त्यामुळे लहान वाहने ये-जा करीत होती. मात्र एसटी, ट्रक यासारखी मोठी वाहने जाऊ शकत नव्हती. त्यामुळे वाहनांची लांबच लांब रांग लागली होती.
तळोधी मो. : तळोधी ते पावीमुरांडा मार्गादरम्यान जोगना गावाजवळील नाल्यावरून सोमवारी सायंकाळपासून पाणी वाहात आहे. त्यामुळे या मार्गावरील सुमारे ३५ गावांचा संपर्क तुटला आहे. मुरमुरी, येडानूर, पांढरी भटाळ, लसनपेठ टोली, बानगुडा, लेनगुडा, ढेकणी या गावांचा समावेश आहे. ढेकणीसमोर मुतमुर नाल्यावर पाणी आहे. पुसेर गावाजवळून नाला वाहतो. या नाल्यावर पूल नाही. पावसाच्या पाण्याने नाला ओसंडून वाहत आहे. कुथेगाव-येडानूर दरम्यान रावनपल्ली गावाजवळ असलेल्या नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने याही गावांचा संपर्क तुटला आहे.
सोमवारी गडअहेरी नाला, झुरी नाला, डुम्मे नाल्यावरील पुलांवर पाणी होते. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक मंगळवारी दुपारपर्यंत ठप्प होती. मंगळवारी दुपारी पावसाचा जोर ओसरला. त्यामुळे नदी, नाल्यांच्या पुलावरील पाणी ओसरल्याने हे सर्व मार्ग मंगळवारी सायंकाळी सुरू झाले. मात्र आमगाव-विसापूर मार्गावरील पोहार नाल्यावर मंगळवारी सकाळी पाणी जमा झाले होते.
पावसाच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी मासेमारी केली जात होती. गडचिरोली शहरातही ठिकठिकाणी जाळ टाकून मासे पकडले जात होते. पाऊस थांबल्याने आता रोवणीच्या कामांना वेग येणार आहे.

भामरागड व मुलचेरात पावसाचा कहर
गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर व छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेले भामरागड हे तालुकास्थळ पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती या तीन नद्यांनी वेढले आहे. भामरागड तालुक्यात सोमवारी सकाळपासून पावसाने कहर केला. या तालुक्यात एकाच दिवशी सुमारे २६८.५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीवरील पुलावरून चार फूट पाणी वाहत होते. त्यामुळे भामरागडसह पलिकडील शेकडो गावे मंगळवारी संध्याकाळपर्यंत संपर्काबाहेर होते. गेल्या दोन दिवसांपासून भामरागडमधील नागरिकांचा उर्वरित जगाशी संपर्क तुटलेला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने पर्लकोटा नदीच्या पुराचा फटका बसणाºया २५० ते ३०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले. सॅटेलाईट फोनवरून तेथील पथकाशी संपर्क साधून परिस्थितीवर नजर ठेवली जात आहे. मुलचेरा तालुक्यातही २४ तासात २७५ मिमी पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वत्र पाणीच पाणी साचल्याने नागरिकांना घराबाहेर निघणेही कठीण झाले आहे.

अनेक ठिकाणचा वीज पुरवठा-मोबाईलही बंद
भामरागडसह अनेक गावांचा वीज पुरवठा दोन दिवसांपासून खंडित झाला आहे. त्यामुळे मोबाईल टॉवरच्या बॅटरीही डिस्चार्ज होऊन त्या टॉवरने काम करणे बंद केले आहे. परिणामी मोबाईल-इंटरनेट सुविधाही ठप्प पडली आहे. त्यामुळे नागरिकांना कोणाशीच संपर्क करणे अशक्य होऊन मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसात भामरागडचा अनेक वेळा संपर्क तुटतो. अशावेळी मोबाईल सेवा सुरू असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र बीएसएनएलचे अधिकारी त्याकडे फारसे लक्ष देत नाही. त्यामुळे एकदा मोबाईल टॉवर बंद झाल्यानंतर ते आपल्या सवडीप्रमाणे दुरूस्त करतात. त्यांना जिल्हा प्रशासनाने योग्य ते निर्देश देण्याची मागणी केली जात आहे. बीएसएनएल टॉवरचा विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने टॉवर बंद पडत असल्यास जनरेटरकरिता आपत्ती व्यवस्थापनच्या निधीतून तत्काळ डिझेलचा पुरवठा तहसीलदारांनी करून दूरसंचार सेवा सुरळीत करावी, असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे देण्यात आले आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.

Web Title: The district is wet with heavy rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.