जिल्ह्याला रुग्णवाहिका मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 11:44 PM2018-02-01T23:44:02+5:302018-02-01T23:44:58+5:30
नक्षलग्रस्त व अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्यसेवा रामभरोसे सुरू आहे. येथील अनेक रुग्णालयांमध्ये डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने रुग्ण त्रस्त आहेत. पुरेशा प्रमाणात रुग्णवाहिकाही उपलब्ध नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षलग्रस्त व अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्यसेवा रामभरोसे सुरू आहे. येथील अनेक रुग्णालयांमध्ये डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने रुग्ण त्रस्त आहेत. पुरेशा प्रमाणात रुग्णवाहिकाही उपलब्ध नाहीत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात बैठक बोलविण्यात आली. या बैठकीत खा. अशोक नेते यांनी गडचिरोली जिल्ह्याला शासनाकडून नव्या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे जिल्ह्याला लवकरच नव्या रुग्णवाहिका मिळणार आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्यविषयक समस्या मार्गी लावण्याच्या उद्देशाने बैठक बोलाविली. या बैठकीला प्रामुख्याने खा. अशोक नेते उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यात एक जिल्हा सामान्य रुग्णालय, तीन उपजिल्हा, नऊ ग्रामीण रुग्णालय आहेत. याशिवाय जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३७६ आरोग्य उपकेंद्र तसेच काही आरोग्य पथक व फिरत्या चिकित्सालयाची व्यवस्था आहे. जिल्ह्यातील बहुतांश भाग दुर्गम असल्याने रुग्णांना रुग्णालयात ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागतो.
जिल्ह्यात गर्भवती महिलांना रुग्णालयात आणण्यासाठी तसेच घरी पोहोचविण्यासाठी १०२ क्रमांकाच्या केवळ आठ रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. जिल्ह्यात १ हजार ६०० पेक्षा अधिक गावे आहेत. एवढ्या मोठ्या गावातील रुग्णांना सुविधा देण्यासाठी उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका कमी पडत आहेत. अपघात तसेच दुर्घटनेतील गंभीर रुग्णांना रुग्णालयात आणण्यासाठी वेळेवर शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. परिणामी अनेक जणांना जीव गमवावा लागतो. जिल्ह्यात सद्य:स्थितीत १०८ क्रमांकाच्या नऊ रुग्णवाहिका आहेत. बºयाचदा एकाचवेळी अनेक ठिकाणी अपघात झाल्यास तेथील जखमी रुग्णांना रुग्णालयात वेळेवर पोहोचविणे शक्य होत नाही. या सर्व समस्यांची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खंडाते यांनी सविस्तरपणे खा. अशोक नेते यांना दिली.
यावर खा. नेते यांनी जिल्ह्यातील आरोग्याची समस्या केंद्र व राज्य शासनाकडे आग्रहीपणे मांडून २०१८ वर्षात गडचिरोली जिल्ह्याला नव्या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा आपण प्रयत्न करू, असे सांगितले. बैठकीला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांच्यासह प्रमुख वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.