कौशल्य विकासासाठी जिल्ह्याला 175 कोटींचा निधी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 05:00 AM2021-12-05T05:00:00+5:302021-12-05T05:00:50+5:30
केवळ पोलिसांच्या कारवाईने या जिल्ह्यातील नक्षलवाद संपणार नाही. त्यासाठी रोजगार आणि विकासात्मक कामांवर भर देण्याचा प्रयत्न आहे. गडचिरोली जिल्ह्यात मेडिकल कॉलेजसह चांगल्या शाळा, आरोग्याच्या सोयी-सुविधा निर्माण केल्या जात आहेत. सोबतच तालुकास्तरावर आरोग्य तपासणी व उपचार शिबिरे घेण्याच्या सूचना केल्या असल्याचे ते यावेळी म्हणाले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : गडचिरोली जिल्ह्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे करणे गरजेचे आहे ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यातून या जिल्ह्याची मागासलेपणाची ओळख पुसायची आहे. तरुण वर्गाला रोजगार मिळण्यास सक्षम बनविण्यासाठी त्यांना कौशल्य विकासाची जोड मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसकडून (टीसीएस) जिल्ह्याला १७५ कोटींचा निधी मिळणार आहे, अशी माहिती पालकमंत्रीएकनाथ शिंदे यांनी शनिवारी (दि.४) येथे बोलताना दिली.
येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित मेळाव्यात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हा समन्वयक किरण पांडव, जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार, महिला आघाडी प्रमुख छाया कुंभारे, भरत जोशी, युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख उमा चंदेल यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, केवळ पोलिसांच्या कारवाईने या जिल्ह्यातील नक्षलवाद संपणार नाही. त्यासाठी रोजगार आणि विकासात्मक कामांवर भर देण्याचा प्रयत्न आहे. गडचिरोली जिल्ह्यात मेडिकल कॉलेजसह चांगल्या शाळा, आरोग्याच्या सोयी-सुविधा निर्माण केल्या जात आहेत. सोबतच तालुकास्तरावर आरोग्य तपासणी व उपचार शिबिरे घेण्याच्या सूचना केल्या असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी शिवसेनेच्या विविध आघाड्यांसोबत काँग्रेसच्या वतीनेही शिंदे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
निधी कमी पडू देणार नाही
नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना सोबत घेऊन लढायचे किंवा कसे ते तुम्हीच आपल्या पातळीवर ठरवा, अशी सूचना करत त्यांनी कार्यकर्त्यांनी स्वतःला उमेदवार समजून पुढाकार घेऊन निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांसाठी काम करावे, असे आवाहन केले. कुरखेडा नगरपंचायतींमधील विविध कामांचे प्रस्ताव आपल्याकडे आले आहेत. त्यासाठी निधी कमी पडणार नाही, असे शिंदे यावेळी म्हणाले.