भारतीय संस्कृतीचे वैविध्य जगाला आकर्षित करणारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:07 AM2018-06-10T00:07:21+5:302018-06-10T00:07:21+5:30
भारतीय लोक अतिशय चांगले व प्रत्येक बाबतीत सहकार्य करणारे आहेत. पण या ठिकाणी महिला पाहिजे त्या प्रमाणात सुरक्षित नाहीत. असे असले तरी भारतीय संस्कृती वैविध्यपूर्ण आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भारतीय लोक अतिशय चांगले व प्रत्येक बाबतीत सहकार्य करणारे आहेत. पण या ठिकाणी महिला पाहिजे त्या प्रमाणात सुरक्षित नाहीत. असे असले तरी भारतीय संस्कृती वैविध्यपूर्ण आहे. या संस्कृतीचे वेगळेपण जगाला आकर्षित करणारे आहे, अशी भावना जर्मनीमधील रूथ थॉमन आणि बेक फ्रेयर या दोन युवतींनी व्यक्त केली.
इंडो-जर्मन सहकार्य प्रकल्पांतर्गत भारतीय समाजरचनेचा अभ्यास करण्यासाठी त्या दोघी ६ महिन्यांकरिता भारतात आल्या आहेत. इंडियन इन्स्टिट्युट आॅफ युथ वेलफेअरच्या माध्यमातून त्या सध्या नागपूरमध्ये वास्तव्यास आहेत. मागास जिल्हा असलेल्या गडचिरोलीमध्ये आरोग्य सुविधा कशा आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्रात सामाजिक संस्थांची भूमिका काय आहे, याची पाहणी करण्यासाठी त्यांनी तीन दिवस इंडियन इन्स्टिट्युट आॅफ युथ वेलफेअरचे जिल्हा समन्वयक मनोहर हेपट यांच्यासोबत गडचिरोली जिल्ह्यातील काही ठिकाणी भेटी दिल्या. मोहझरी व पोर्ला प्राथमिक आरोग्य केंद्राचीही त्यांनी पाहणी केली. त्यानंतर काही अधिकाºयांच्या भेटी घेऊन चर्चा केली. शेवटच्या दिवशी त्यांनी ‘लोकमत’ जिल्हा कार्यालयाला भेट देऊन आपले अनुभव कथन केले.
सदर युवतींनी भारतीय आणि जर्मन संस्कृतीमधील फरक सांगितला. जर्मनीत मुलगी १८ वर्षाची झाली की ती आपला निर्णय घेण्यासाठी मोकळी असते. आपल्या करिअरपासून तर लग्नापर्यंतचा निर्णय तीच घेते. प्रत्येक लग्न हे लव्ह मॅरेजच असल्यामुळे कधीकधी निर्णय चुकतात. त्यातून होणाऱ्या घटस्फोटाचे प्रमाण ३० टक्के आहे. असे असले तरी तिथे भारतापेक्षा महिला अधिक सुरक्षित आहे. समाजात त्यांना सन्मान मिळतो. कुटुंबात पुरूष घरकामात, किचनमध्ये महिलांना मदत करतात, असेही त्यांनी सांगितले.
भारतात योग्य आरोग्य सेवा, रोजगार याचा अभाव असल्याचे त्या म्हणाल्या. जर्मनीतील सार्वजनिक आरोग्यसेवेसाठी सरकारकडून प्रत्येकाचा विमा काढला जातो. त्यामुळे आजारांच्या खर्चाचा बोजा सर्वसामान्य लोकांवर पडत नसल्याचे रूथ आणि बेक यांनी सांगितले. सुरूवातीला लोकमत कार्यालयात त्यांचे जिल्हा कार्यालय प्रमुख डॉ.गणेश जैन, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने आणि लोकमत समाचारचे सुनील चौरसिया यांनी स्वागत केले. यावेळी मनोहर हेपट, डॉ.सुषमा जैन लोकमत सखी मंचच्या जिल्हा संयोजिका रश्मी आखाडे, बालविकास मंचच्या जिल्हा संयोजिका किरण पवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
‘सखी मंच’सारखे व्यासपीठ गरजेचे
यावेळी रूथ व बेक या दोन्ही युवतींनी लोकमतच्या कामकाजाचे अवलोकन केले. पहिल्यांदाच एखाद्या वृत्तपत्राच्या कार्यालयात जाऊन कामकाज कसे चालते हे पाहात असल्याचे त्यांनी सांगितले. लोकमत, लोकमत समाचार आणि लोकमत टाईम्स या तीनही भाषेतील प्रकाशनासोबत इव्हेंट विभागाकडून महिला व बालकांसाठी चालविल्या जाणाऱ्या लोकमत सखी मंच, बालविकास मंचच्या कार्यपद्धतीचीही माहिती त्यांनी औत्सुक्याने जाणून घेतली. महिलांच्या उन्नतीसाठी सखी मंचसारखे व्यासपिठ गरजेचे असून असा महिलांसाठी काम करणारा असा मंच जर्मनीतही पहायला मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले.