दिव्यांग हे विशेष व्यक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 10:29 PM2017-12-23T22:29:14+5:302017-12-23T22:29:29+5:30
दिव्यांग व्यक्तींमध्ये सर्वसामान्य व्यक्तीच्या तुलनेत विशेष गुण असतात. त्यामुळे त्यांना अपंग न समजता दिव्यांग म्हणण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. ज्या व्यक्तीच्या मनाची उंची अधिक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दिव्यांग व्यक्तींमध्ये सर्वसामान्य व्यक्तीच्या तुलनेत विशेष गुण असतात. त्यामुळे त्यांना अपंग न समजता दिव्यांग म्हणण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. ज्या व्यक्तीच्या मनाची उंची अधिक आहे. त्या व्यक्तीला शारीरिक अडचण कधीच निर्माण होत नाही. त्यामुळे दिव्यांगांनी स्वत:मधील न्यूनगंड दूर करावा, असे प्रतिपादन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
महाराष्टÑ राज्य अपंग कर्मचारी, अधिकारी संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने चामोर्शी मार्गावरील कमल केशव सभागृहात जिल्हास्तरीय दिव्यांग कर्मचारी मेळाव्याचे आयोजन शनिवारी करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते होते. सहउद्घाटक म्हणून आमदार देवराव होळी, कृष्णा गजबे, प्रमुख अतिथी म्हणून महाराष्टÑ राज्य अपंग कर्मचारी, अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बंडू कुमरे, संघटनेचे पदाधिकारी अतुल मेश्राम, लालाजी पिपरे, पुरंदर इंदुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना पालकमंत्री अम्ब्रीशराव म्हणाले, समाजातील सर्वसामान्य व्यक्तीचा विकास व्हावा, यासाठी केंद्र व राज्य शासन अनेक योजना राबवित आहे. दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करू, गडचिरोली शहरात जागा उपलब्ध करून द्यावी, त्या जागेवर दिव्यांगांसाठी भवन बांधून दिले जाईल. दिव्यांग प्रमाणपत्र गुरूवार व शुक्रवारी देण्यासंदर्भात पाठपुरावा करू, असे मार्गदर्शन केले.
खासदार अशोक नेते यांनी मार्गदर्शन करताना अपंगांनी आजपर्यंत अनेक क्षेत्र गाजविले आहेत. अपंग हा समाजाचा अभिन्न अंग आहे. अपंगांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. आमदार गजबे यांनी दिव्यांगांचा समाजाने आदर केला पाहिजे. शारीरिक व्यंग असले तरी सदर व्यक्ती मनाने सुदृढ आहे. दिव्यांग व्यक्तीने आत्मविश्वासाने अडचणींचा सामना करून स्वत:चा ठसा समाजात निर्माण करावा, असे मार्गदर्शन केले.
आमदार डॉ. देवराव होळी यांनी मार्गदर्शन करताना गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींच्या रिक्त पदांकडे लक्ष वेधले. सरकार दिव्यांग व्यक्तींना केवळ चार टक्के आरक्षण देत आहे. सदर आरक्षण वाढविण्यासाठी आपण पाठपुरावा करू, त्याचबरोबर रिक्त पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठी सुध्दा प्रयत्न करू, असे मार्गदर्शन केले.
संचालन अतुल मेश्राम तर आभार लक्ष्मण वाढई यांनी मानले.