दिव्यांग विद्यार्थिनींची उत्तुंग भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:57 AM2021-01-08T05:57:30+5:302021-01-08T05:57:30+5:30
गडचिरोली : गडचिरोली येथील विद्यार्थिनी करिष्मा नरेंद्र मल (माहेश्वरी) हिच्यासह महाराष्ट्रातील ७० दिव्यांग विद्यार्थिनींनी राज्यातील सर्वात उंच असलेले कळसुबाई ...
गडचिरोली : गडचिरोली येथील विद्यार्थिनी करिष्मा नरेंद्र मल (माहेश्वरी) हिच्यासह महाराष्ट्रातील ७० दिव्यांग विद्यार्थिनींनी राज्यातील सर्वात उंच असलेले कळसुबाई शिखर सर करून नावलाैकीक केला आहे. या उत्तुंग भरारीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शिवुर्जा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी ३१ डिसेंबरला महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगांना कळसुबाई शिखर सर करण्यासाठी संधी दिल्या जाते. यावर्षी या मोहिमेत येथील करिश्मा मल हिने सहभाग दर्शविला. ३१ डिसेंबर २०२० रोजी दुपारी ४ वाजता कळसुबाई मातेचे दर्शन घेऊन पुढील सैर करण्यास सर्व दिव्यांग निघाले. कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असून, आदिवासींचे दैवत असलेल्या कळसुबाई शिखराची उंची ५४०० फूट आहे. दिव्यांगांना शिखर पार करण्यास जवळपास ५ तासांचा अवधी लागला. रात्रभर शिखरावर मुक्काम करून १ जानेवारी २०२१ रोजी सुर्याचे दर्शन घेऊन शिखर उतरण्यास सुरुवात केली. पायथ्याशी असलेल्या जहांगीरदारवाडी या गावी पाेहाेचल्यानंतर माेहिमेचा शेवट करण्यात आला.
शिवुर्जा या प्रतिष्ठानतर्फे गेल्या ९ वर्षांपासून दिव्यांगांना प्रेरणा देण्यासाठी ही मोहीम राबविली जाते. या मोहिमेत महाराष्ट्रभरातील ७० दिव्यांगांनी सहभाग दर्शविला होता. कळसुबाई शिखर सर केल्याबद्दल प्रतिष्ठानतर्फे प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मानित करण्यात आले.