दिवाळी फिवर, शासकीय कार्यालये पडली ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2022 10:52 PM2022-10-29T22:52:38+5:302022-10-29T22:53:12+5:30
काही कार्यालयांतील अधिकाऱ्यांच्या कक्षाला कुलूप लागल्याचे दिसून आले. काही कर्मचारी दाेन दिवसांची किरकाेळ रजा घेऊन सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. तर काही कर्मचारी हाफ ड्युटी करून उर्वरित वेळेत घराकडे चकरा मारत असल्याचे गुरुवारला दिसून आले. काही कर्मचारी परिसरात फिरताना यावेळी दिसून येत हाेते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : २२ ऑक्टाेबर २०२२ शनिवारपासून बुधवारपर्यंत दिवाळीनिमित्त शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवसांच्या सुट्ट्या शासनाच्या वतीने देण्यात आल्या हाेत्या. सहाव्या दिवशी २७ ऑक्टाेबर गुरुवारपासून शासकीय कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सुट्ट्या संपल्या; मात्र गडचिराेली जिल्ह्याच्या बाहेर रहिवासी असलेले कर्मचारी गुरुवारी कर्तव्यावर रूजू झाले नाहीत. दरम्यान, गुरुवार व शुक्रवारला या दाेन्ही बहुतांश शासकीय कार्यालयात ४० ते ४५ टक्केच कर्मचारी उपस्थित हाेते. अनेक शासकीय कार्यालयातील खुर्च्या व टेबल ओस पडल्याचे यावेळी दिसून आले.
यावर्षी २४ ऑक्टाेबर राेजी दिवाळी सणादरम्यान लक्ष्मीपूजन करण्यात आले. शनिवार २२ ऑक्टाेबरपासून शासकीय कार्यालयांना सुट्टी असल्याने पाच दिवसांचा अवकाश हाेता. त्यानंतर २७ ऑक्टाेबर गुरुवारला जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरू झाली; मात्र बऱ्याच कार्यालयांत अर्धे तर काही कार्यालयांमध्ये अर्ध्यापेक्षा कमी कर्मचारी कर्तव्यावर दिसून आले.
काही कार्यालयांतील अधिकाऱ्यांच्या कक्षाला कुलूप लागल्याचे दिसून आले. काही कर्मचारी दाेन दिवसांची किरकाेळ रजा घेऊन सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. तर काही कर्मचारी हाफ ड्युटी करून उर्वरित वेळेत घराकडे चकरा मारत असल्याचे गुरुवारला दिसून आले. काही कर्मचारी परिसरात फिरताना यावेळी दिसून येत हाेते.
नागरिकांनीही दाखविली पाठ
- पंचायत समिती, तहसील कार्यालय तसेच जिल्हा परिषदेचे विविध विभाग, ग्राम पंचायत, तलाठी कार्यालय तसेच याेजनांची अंमलबजावणी केल्या जाणाऱ्या कार्यालयांत गुरूवारी व शुक्रवारी बाेटावर माेजण्या इतकेच कर्मचारी उपस्थित हाेते. अशा परिस्थितीमुळे ग्रामीण भागातून विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांनीही शासकीय कार्यालयाच्या भेटीकडे पाठ दाखविली. कर्मचारीच नसल्याने काम हाेणार नाही. हे त्यांना ठाऊक हाेते.
परजिल्ह्यातील अधिकारी सुट्ट्यांवरच
गडचिराेली जिल्ह्यात चंद्रपूर व गडचिराेली जिल्ह्यातील रहिवासी असलेले बाेटावर माेजण्याइतकेच अधिकारी येथील कार्यालयात आहेत. हे अधिकारी सणाच्या सुट्ट्या संपल्यानंतर लगेच शासकीय कार्यालयांत आपल्या कर्तव्यावर हजर हाेतात; मात्र गडचिराेली जिल्ह्यात ७० टक्क्यांपेक्षा अधिक अधिकारी परजिल्ह्यातील रहिवासी आहेत. दिवाळीच्या पाच सुट्ट्या मिळाल्यानंतर बहुतांश अधिकाऱ्यांनी गुरुवार व शुक्रवारला रजा घेतली. आता हे अधिकारी साेमवारलाच जिल्ह्यात कर्तव्यावर रूजू हाेणार आहेत.
स्थानिकांच्याच भरवशावर प्रशासकीय कामकाजाची भिस्त
- गडचिराेली जिल्ह्यातील मूळ रहिवासी तसेच इथेच राहत असलेल्या कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर अतिरिक्त रजा घेतल्या नाहीत. पाच दिवस सण साजरा केल्यानंतर सहाव्या दिवशी गुरुवारला जिल्हा व तालुका मुख्यालयाच्या कार्यालयात जाऊन कर्तव्यावर रूजू झाले. सदर दाेन दिवस स्थानिक कर्मचाऱ्यांच्या भरवशावरच प्रशासकीय कामकाजाची भिस्त हाेती.
समाजकल्याण कार्यालयात शुकशुकाट
- काॅम्प्लेस परिसरातील सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयात प्रस्तूत प्रतिनिधींनी गुरुवारला ३ वाजता भेट दिली असता, येथे एक चाैकीदार, एक शिपाई वगळता इतर काेणतेही कर्मचारी हजर नव्हते. कार्यालयातील सर्व टेबल व खुर्च्या ओस पडल्याचे दिसून आले. दरम्यान चाैकशी केली असता, काही कर्मचारी आले आहेत; मात्र ते बाहेर गेले आहेत, असे उपस्थित चाैकीदाराने सांगितले.
अधिकाऱ्यांचेही कक्ष कुलुपबंद
- सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयातील सहायक आयुक्त यांचे कक्ष गुरुवारला कुलूपबंद हाेते. तसेच जिल्हा परिषदमधील विविध विभागातील अनेक अधिकाऱ्यांचे कक्ष कुलूपबंद हाेते. तर काही अधिकाऱ्यांचे कक्ष नाममात्र सुरू हाेते. समाजकल्याण कार्यालयाच्या इमारतीत विविध महामंडळाचे कार्यालये आहेत. दरम्यान, येथील चर्मकार विकास महामंडळाचे कार्यालय कुलूपबंद हाेते.
झेडपीचे अनेक विभाग ओस
- जिल्हा परिषदमध्ये विविध विभागाची कार्यालये आहेत. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर गुरुवारला कर्तव्याच्या दिवशी येथील अनेक विभागात अर्धेच कर्मचारी उपस्थित हाेते.
- बांधकाम, समाजकल्याण, कृषी, महिला व बालकल्याण या कार्यालयातील अनेक खुर्च्या रिकाम्या हाेत्या. येथील प्रत्येक विभाग सुरू असले तरी काही ठिकाणी दाेन ते तीन कर्मचारी तर काही कार्यालयात सहा ते सात कर्मचारी दुपारच्या सुमारास उपस्थित असल्याचे दिसून आले. तालुकास्तरावरील अनेक शासकीय कार्यालयात असेच चित्र हाेते.