तांत्रिक कुशलतेने विकास कामे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:19 PM2017-09-18T23:19:57+5:302017-09-18T23:20:09+5:30
बदलत्या काळानुसार अभियंत्यांनी कामाची कुशलता व तांत्रिक अचुकतेवर भर देऊन विकास कामे करावी, ....
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बदलत्या काळानुसार अभियंत्यांनी कामाची कुशलता व तांत्रिक अचुकतेवर भर देऊन विकास कामे करावी, भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांना दीपस्तंभ माणून विकासाच्या वाटेवर प्रवास करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जे.वाय. सदाफळ यांनी केले.
जिल्हा परिषद अभियंता संघटना, तांत्रिक कर्मचारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिनाचे आयोजन गोंडवाना कलाभवन येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन अभियंता जे.वाय. सदाफळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे अध्यक्ष भुजंग हिरे होते. प्रमुख अतिथी म्हणूून पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता के.आर. घोडमारे, ए.जी. रामटेके, रवींद्र भरडकर, जिल्हा परिषद अभियंता, तांत्रिक कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष एस.व्ही. दुमपंटीवार, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणादरम्यान भुजंग हिरे यांनी मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना म्हणाले, विश्वेश्वरैया यांना दीर्घायुष्य लाभले, ही केवळ नशीबाची बाब नसून प्रत्येकाने आपल्या शासकीय कामासोबत स्वत:ची प्रकृती व कुटुंबाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आयुष्याच्या शेवटपर्यंत उत्साह, जोम आणि निश्चिय राखता आला पाहिजे, यासाठी मन गुंतून राहील, असा व्यवसाय करावा, सामाजिक न्याय व तांत्रिक कुशलता यांचा संगम साधून अभियंत्यांनी कार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी रामटेके, घोडमारे, कुंभार यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. अभियंता दिनाचे औचित्य साधून वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. संचालन व्ही.टी. जुआरे यांनी तर आभार महेंद्र भैसारे यांनी मानले. यशस्वीतेसाठी गौरकर, भाले, सातदेवे, शाखा अभियंता श्रीरामे यांनी सहकार्य केले.