नव्या वर्गाना परवानगी देऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 11:54 PM2019-05-03T23:54:06+5:302019-05-03T23:55:20+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये नव्याने इयत्ता पाचवी व आठवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात विमाशिसंच्या पदाधिकाऱ्यांनी थेट माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय गाठून त्यांना निवेदन दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये नव्याने इयत्ता पाचवी व आठवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात विमाशिसंच्या पदाधिकाऱ्यांनी थेट माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय गाठून त्यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शैक्षणिक सत्र २०१८-१९ च्या समाप्तीनंतर इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थी इयत्ता पाचवीत तर इयत्ता सातवी उत्तीर्ण विद्यार्थी इयत्ता आठवीत नजीकच्या शाळांमध्ये प्रवेश घेतात. मात्र शैक्षणिक सत्र २०१९-२० पासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व खासगीव्यवस्थापनांच्या काही शाळांमध्ये नव्याने इयत्ता पाचवी व आठवीचे वर्ग सुरू करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. आरटीईनुसार पुढील शिक्षण घेण्याची सोय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असल्याने नव्याने तुकडी सुरू करण्याची आवश्यकता नाही. याचा परिणाम अनुदानित शाळांच्या इयत्ता पाचवी व आठवीच्या तुकड्यांवर होत आहे. त्या तुकड्यांवरील शिक्षक अतिरिक्त ठरतात. परिणामी शिक्षक समायोजनाची समस्या निर्माण होते. त्यामुळे नजीकच्या परिसरात प्रस्थापित अनुदानित शाळांच्या पटसंख्येवर परिणाम होऊ नये, यासाठी नवीन वर्ग तुकड्यांना परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे. उपशिक्षणाधिकारी रमेश उचे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी विमाशिसंचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, जिल्हाकार्यवाह अजय लोंढे, नरेंद्र भोयर, सुरेंद्र मामिडवार, अरविंद उरकुडे, रेवनाथ लांजेवार, प्रकाश तालम आदी उपस्थित होते.