सुट्टे खाद्यतेल घरी आणू नका; हृदयविकार, भेसळीचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 01:01 PM2024-07-26T13:01:11+5:302024-07-26T13:03:28+5:30
सणासुदीत वाढतो प्रकार : पोटातील विकार बळावण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : खाद्यतेलांमध्ये आता भेसळीचे प्रमाण वाढले असल्याने भेसळयुक्त तेल खाणेसुद्धा नागरिकांच्या जीवावर बेतू शकते. बोगस तेलामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका असतो. तसेच पोटातील विविध आजार बळावण्याचाही धोका बळावला आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने खाद्यतेलाची तपासणी केली जाते. या तपासणीत सुट्टया तेलाचे नमुने गोळा करून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जातात. खाद्यतेलात केमिकल तसेच रंग मिसळण्यात येते. ग्रामीण भागात या सुट्टया तेलाला प्रचंड मागणी असते. त्यामुळेच तेथे मोठ्या प्रमाणात बोगस तेलाची विक्री होते. सुट्टया तेलात भेसळ असण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे ग्राहकांनी आरोग्य जपण्यासाठी या किरकोळ तेल विक्रीच्या दुकानातून खरेदी करू नये. तेल कंपन्यांनी नियम पाळावे. पॅकबंद तेलच विकण्याचे शासन आदेशाचे पालन करावे.
किराणा दुकानांत सर्रास विक्री
ग्रामीण तसेच शहरी भागातील झोपडपट्टीच्या परिसरात सुट्टया तेलाची विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते. अनेकजण स्वस्त तेल म्हणून हे तेल खरेदी करतात. विशेष म्हणजे, त्या परिसरातील नागरिकांची ती गरज असते.
घाण्याच्या नावावर खाद्य तेलाची विक्री
आमचा स्वतःचा तेलाचा घाणा आहे, असे सांगून काही जण सुटे तेल विकत आहेत. ग्रामीण भागातील दुकानातून सुट्टे तेल मोठ्या प्रमाणावर विक्री होते. समोसा, भजी तळण्यासाठी सुट्ट्या तेलाचा वापर करीत असल्याचे दिसते.
भेसळ ते कसे ओळखावे?
तेलाचे थेंब हातावर घेऊन ते घासावेत तेल गरम झाले की त्याचा वास घ्यावा. केमिकलयुक्त तेलात केमिकलचा वास येतो. तेल फ्रीजमध्ये ठेवल्यास पामतेल खाली घट्ट होते. गोडेतेल फ्रिजरमध्ये गोठवावे.
ग्राहक असतात अनभिज्ञ
खाद्यतेल कोणीही एकदम वापरत नाही. त्याची चव ही कोणी चाखून पाहत नाही. मात्र त्या भेसळीच्या तेलाचे पदार्थ हमखास खारट होतात. त्याचे खापर स्वयंपाक करणाऱ्या गहिणीच्या माथी फटते.
अशी केली जाते भेसळ
खाद्यतेलात कधी पामतेल, स्वस्त तेल तसेच फ्लेवर तर कधी मीठ मिसळून भेसळयुक्त तेल ग्राहकांच्या माथी मारले जाते. सुट्टे तेल विक्रीला बंदी नव्हती तेव्हा सर्रास १५ किलो तेलात एखादा किलो मीठ टाकले जायचे.
किडनी, हृदयाला सर्वाधिक धोका
चांगल्या तेलातही काही प्रमाणात पाम तेल, मीठ, वापरलेले तेल मिसळून ते गरीब ग्राहकांच्या माथी मारले जाते. मात्र, भेसळयुक्त खाद्यतेलामुळे किडनी व हृदयाला अपाय होतो.
तपासणीसाठी घेतले सहा नमुने
जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने गेल्या सहा महिन्यात तपासणीसाठी तेलाचे ६ नमुने घेण्यात आले. तसेच तपासणीसाठी १२ प्रकरणे लॅबमध्ये पाठविण्यात आलेले आहेत. सणासुदीच्या काळात तेलाची तपासणी मोठ्या प्रमाणात केली जाते.
"अन्न व औषध विभागातर्फे तेलाची तपासणी वर्षभरच केली जाते. नमुने लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविले जातात. उघड्या डोळ्यांनी तेलाची शुद्धता तपासता येत नाही. त्यामुळे तपासणी करून नमुने परत येण्यासाठी अनेकदा उशीर होतो."
- सुरेश तोरेम, अन्न सुरक्षा अधिकारी