‘आदर्श’ पुरस्कारासाठी शिक्षकच मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 01:23 AM2018-08-30T01:23:17+5:302018-08-30T01:24:13+5:30
शिक्षकी पेशाप्रती प्रामाणिक राहून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासोबतच शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन शिक्षकदिनी सन्मानित केल्या जाते.
दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शिक्षकी पेशाप्रती प्रामाणिक राहून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासोबतच शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन शिक्षकदिनी सन्मानित केल्या जाते. मात्र या पुरस्कारापोटी फारसा लाभ मिळत नसल्याने आदर्श शिक्षक पुरस्कार मिळविण्याबाबत शिक्षकांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हाभरातून केवळ ११ प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती शिक्षण विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत दरवर्षी थोर शिक्षण तज्ज्ञ डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी शिक्षक दिनानिमित्त जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यंदाही ५ सप्टेंबर रोजी बुधवारला जि.प.च्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा रंगणार आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जि.प.च्या शिक्षण विभागाने जुलै महिन्यापासून जि. प. शाळांच्या शिक्षकांकडून प्रस्ताव मागितले. सुरुवातीला पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याची मुदत १० आॅगस्ट ठेवण्यात आली होती. त्यानंतर ही मुदत १३ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आली. मात्र अत्यल्प प्रस्ताव आल्याने प्रस्ताव मागविण्याची मुदत पुन्हा ३१ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आली. मुदत संपण्यासाठी केवळ दोन दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. २९ आॅगस्ट बुधवारपर्यंत शिक्षण विभागाकडे प्राथमिक शिक्षकांचे एकूण १० व माध्यमिक विभागाच्या पुरस्कारासाठी एटापल्ली तालुक्यातून एक असे एकुण ११ प्रस्ताव प्राप्त झाले आहे जि. प.मार्फत आदर्श शिक्षकांचा गौरव होत असताना देखील यासाठीचे प्रस्ताव सादर करण्यास जिल्ह्यातील शिक्षक फारसे उत्सुक नसल्याचे दिसून येते. याचे कारण वेतनवाढ मिळत नसून पुरस्काराची रक्कमही अल्प असते. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात व शाळा गुणवत्तेमध्ये भरीव व उल्लेखनीय कामगिरी असूनही बरेच शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करीत नसल्याचे दिसून येत आहे.
जि.प. शिक्षण विभागाच्या वतीने गतवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कारांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान आदर्श शिक्षकांना सन्मानचिन्ह व १ हजार १०० रूपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले होते. काही वर्षांपूर्वी जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांना वार्षिक वेतन दिली जात होती. मात्र अशा प्रकारची वेतनवाढ देणे बंद झाल्याने पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याबाबत शिक्षक उदासीन दिसून येत आहेत.
प्रस्ताव कमी प्राप्त झाले असले तरी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या पुढाकाराने यंदा ५ सप्टेंबर रोजीे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
आरमोरी व अहेरी पं.स.तून प्रस्तावही नाही
जि.प.शिक्षण विभागाच्या वतीने १२ तालुक्यातून प्रत्येकी एक याप्रमाणे १२ प्राथमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे नियोजन आहे. तसेच जि.प.च्या माध्यमिक शाळा असलेल्या तालुक्यातून प्रत्येकी एका शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. मात्र २९ आॅगस्टपर्यंत आरमोरी व अहेरी पंचायत समितीमधून प्राथमिक शिक्षकांकडून एकही प्रस्ताव प्राप्त झाला नाही. माध्यमिक विभागातून एटापल्ली तालुक्यातून केवळ एका शिक्षकाचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. उर्वरित तालुक्यातून माध्यमिक शिक्षकांचे प्रस्तावही प्राप्त झाले नाही. प्राथमिक व माध्यमिक मिळून १९ शिक्षकांना सन्मानित करण्याचे नियोजन असते.
जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी बाराही तालुक्यातील शिक्षकांकडून प्रस्ताव मागविले. यासाठी तीनदा मुदतवाढ देण्यात आली. मात्र शिक्षकांकडून फारसा प्रतिसाद दिसून येत नाही. प्राप्त प्रस्तावामधून शिक्षकांना पुरस्कार देऊन ५ सप्टेंबर रोजी सन्मानित करण्यात येणार आहे.
- पी.एच.उरकुडे, शिक्षणाधिकारी (प्राथ.), जि.प.गडचिरोली
कार्यक्रमाची तयारी सुरू
आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याची तयारी सुरू झाली असून हा सोहळा जि.प.च्या ५ सप्टेंबर रोजी बुधवारला पार पडणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर राहणार आहेत.