खतासाठी जादा पैसे देऊ नका

By admin | Published: July 13, 2017 01:41 AM2017-07-13T01:41:58+5:302017-07-13T01:41:58+5:30

कृषी केंद्रामार्फत खताच्या खरेदी-विक्रीमधील होणारा काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने नवी योजना आखली आहे.

Do not pay extra for the fertilizer | खतासाठी जादा पैसे देऊ नका

खतासाठी जादा पैसे देऊ नका

Next

कृषी केंद्राच्या व्यवहारांवर राहणार नजर : १ आॅगस्टपासून पीओएसद्वारे शासकीय दराने खत विक्री
दिलीप दहेलकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कृषी केंद्रामार्फत खताच्या खरेदी-विक्रीमधील होणारा काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने नवी योजना आखली आहे. या योजनेनुसार जिल्ह्यात १ आॅगस्टपासून ५०० कृषी केंद्रांवरून पीओएस मशीनद्वारे शासकीय दराने खताची विक्री होणार आहे. खत खरेदीत संबंधित कृषी केंद्र संचालकांना शेतकऱ्यांनी एकही रूपया जादाचा देऊ नये, असे आवाहन जि. प. च्या कृषी विभागाने केले आहे. विशेष म्हणजे कृषी केंद्रामार्फत खरेदी-विक्री होणाऱ्या व्यवहाराची माहिती आॅनलाईनद्वारे अधिकाऱ्यांना दररोज मिळणार आहे. त्यामुळे खताचा काळाबाजार व शेतकऱ्याच्या फसवणुकीला पूर्णत: रोख लागणार आहे.
पीओएसमशीनमधील नोंदणीनुसार खत उत्पादकांना सरकारकडून सबसिडी मिळणार आहे. शेतकऱ्यांकडील आधारकार्डच्या आधारावर खत खरेदी करताना नोंद करता येणार आहे. जेवढ्या शेतकऱ्यांनी नोंदणीकृत परवानाधारक विक्री केंद्रावरून खताची खरेदी केली, तेवढ्याच शेतकऱ्यानुसार खत उत्पादकांना सबसिडी दिली जाणार आहे. यापूर्वी आतापर्यंत जेवढी खत निर्मिती केली त्यानुसार सबसिडी दिली जात होती. मात्र याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना मिळत नव्हता. उत्पादकांकडून विक्री केंद्रांना जेवढे खत वितरित करण्यात आले, त्यानुसार सबसिडी दिली जात होती. आता जेवढ्या शेतकऱ्यांनी खत खरेदी करतील, त्यानुसारच सबसिडी मिळणार आहे. खतावर सबसिडी मिळवायची असेल तर विक्रेत्याला सर्व व्यवहार पीओएस मशीनद्वारे करावे लागणार आहे. याकरिता एम-एफएमएस प्रणालीवर परवानाधारकाची नोंदणी असणे बंधनकारक आहे. परवानाधारकांकडे युजर आयडी व पीनकोड नंबर असल्यानंतरच परवानाधारकांच्या आधार क्रमांकाच्या आधारे मशीनचा वापर शक्य होणार आहे.
पीओएस मशीनद्वारे जिल्ह्यात खताची विक्री होण्यासाठी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला ५०० पीओएस मशीन देण्याचे शासनाचे नियोजन आहे. यापैकी जि.प.च्या कृषी विभागाला आतापर्यंत ३१४ पीओएस मशीन उपलब्ध झाल्या. त्यापैकी नोंदणीकृत परवानाप्राप्त २०० कृषी केंद्रांना पीओएस मशीनचे वितरण करण्यात आले आहे. ११४ पीओएस मशीन कृषी विभागातर्फे लवकरच कृषी केंद्र संचालकांना वितरित करण्यात येणार आहे. उर्वरित १८६ कृषी केंद्र संचालकांनी एम-एफएमएस आयडी व पीनकोड नंबर दिल्यानंतर त्यांना येत्या १५ दिवसांत कृषी विभागातर्फे पीओएस मशीन वितरित करण्यात येणार आहे.
खताच्या किंमती शासकीय दरानुसार जाहीर करण्यात आल्या आहेत. उज्ज्वला युरियाची प्रती बॅग नवीन एमआरपीनुसार ५ टक्के जीएसटीसह २९५ रूपयांना शेतकऱ्यांना मिळणार आहे. सुफला १५-१५-१५ ची प्रती बॅग ८८७ रूपये तर श्रीफला डीएपी खताची प्रती बॅग १ हजार ७६ रूपयास कृषी केंद्रातून शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. खत खरेदीत सवलतीची रक्कम कपात करून शेतकऱ्यांना मूळ रक्कम द्यावयाची आहे. कृषी केंद्र संचालकांच्या व्यवहारावर प्रशासनाची नजर राहणार आहे.

बेभाव खत विक्रीला लगाम लागणार
पीओएस मशीन मिळण्यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील अनेक कृषी केंद्र संचालकांनी पूर्वीच्या प्रचलित पद्धतीनुसार शेतकऱ्यांना खताची विक्री केली. याची आॅनलाईन कुठलीही नोंद नाही. मात्र आता १ आॅगस्टपासून पीओएस मशीनद्वारे शेतकऱ्यांना पावती देऊन शासकीय दरानुसार खताची विक्री करण्यास बंधनकारक आहे. या संपूर्ण व्यवहाराची माहिती जि. प. कृषी अधिकाऱ्यांसह एम-एफएमएस या आयडीवर २४ तास उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे १ आॅगस्टपासून खताच्या बेभाव विक्रीस व काळा बाजारास पूर्णत: ब्रेक लागणार आहे.

बिलाच्या पावतीत सर्व बाबी समाविष्ट
खत खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचवेळी पीओएस मशीनद्वारे बिलाची पावती मिळणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे नाव, त्यांचा आधार क्रमांक, कोणते व किती बॅग खत खरेदी केले, तसेच खरेदी केलेल्या खताची एकूण किंमत, शासनाकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सवलतीची रक्कम आदी सर्व बाबींची नोंद राहणार आहे. अनुदान तसेच खत विक्रीची रक्कमेची पीओएस मशीनमध्ये नोंद आहे.

सातबाराची जाचक
अट शिथिल
पीओएस मशीन प्रणालीद्वारे खताची विक्री १ आॅगस्ट २०१७ पासून गडचिरोली जिल्ह्यात सर्व कृषी केंद्रातून होणार आहे. मात्र शेतकऱ्यांना ऐनवेळी त्रास होऊ नये याकरिता शासनाने सातबाराची जाचक अट शिथिल केली आहे. त्यामुळे आता एका शेतकऱ्याला कितीही बॅग खत खरेदी करता येणार आहे. शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी केवळ आधारकार्ड द्यावयाचा आहे. आधारकार्ड क्रमांक दिल्याशिवाय शेतकऱ्यांना खत प्राप्त होणार नाही.

कार्यशाळेतून पीओएस मशीन वापरण्याचे धडे
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत आतापर्यंत पीओएस मशीन वितरित करण्यात आलेल्या कृषी केंद्र संचालकांची कार्यशाळा कृषी विकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली देसाईगंज, गडचिरोली, चामोर्शी, अहेरी व सिरोंचा येथे घेण्यात आली. या कार्यशाळेत खत विक्री व्यवहारात पीओएस मशीनचा वापर कसा करावयाचा याबाबतचे धडे कृषी केंद्र संचालकांना देण्यात आले. शेतकऱ्यांनाही याबाबतची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. उर्वरित तालुक्यात कार्यशाळा होणार आहेत.

 

Web Title: Do not pay extra for the fertilizer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.