बालकांचे हक्क व अधिकार हिरावू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:01 PM2019-07-15T23:01:04+5:302019-07-15T23:01:19+5:30
बालकांचे हक्क व अधिकार कोणीही हिरावू नये, शिवाय बालकांचे संरक्षण झाले पाहिजे, त्या दृष्टिकोनातून प्रशासन व शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपस्थित मान्यवर अधिकाऱ्यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बालकांचे हक्क व अधिकार कोणीही हिरावू नये, शिवाय बालकांचे संरक्षण झाले पाहिजे, त्या दृष्टिकोनातून प्रशासन व शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपस्थित मान्यवर अधिकाऱ्यांनी केले.
१९ जुलै रोजी राष्ट्रीय बालहक्क आयोगाची सुनावणी गडचिरोली येथे होणार आहे. या जनसुनावणीच्या अनुषंगाने विविध तक्रारीबाबत निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा व नियोजन बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीला जिल्हा महिला, बाल विकास अधिकारी अतुल भडांगे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूड आदीसह इतर अधिकारी उपस्थित होते.
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमधील बालहक्क व संरक्षणविषयक तक्रारींची सुनावणी १९ जुलै रोजी गडचिरोली घेतली जाणार आहे. या सुनावणीबाबतचा संदेश लोकांपर्यंत पोहोचू द्या, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी जिल्ह्यातील विभागप्रमुखांना यावेळी केल्या.
शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक व इतर विभाग प्रमुखांना बालहक्क सुनावणीबाबत कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गावात दवंडी देणे, रॅली काढणे, बैठका आयोजित करून तक्रारी दाखल करण्याबाबतची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, अशी सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी आर.पी.निकम यांनी दिल्या. यावेळी सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सामाजिक संस्थांचा सहभाग महत्त्वाचा- भडांगे
सदर सुनावणीच्या प्रक्रियेत सामाजिक संस्थांचा सहभाग महत्त्वाचा आहे. संस्थांमार्फत विविध समस्या यावेळी मांडता येतील, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडांगे यांनी केले. यावेळी सामाजिक संस्थांच्या सूचनांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी पालकांना विद्यार्थ्यांमार्फत पत्र देणे, पालकांशी संवाद आदी उपक्रम राबवावे, अशा सूचना दिल्या. तक्रारी येण्यासाठी लोकांपर्यंत माहिती पोहोचणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.