शेती सिंचन बंद करू नका
By admin | Published: March 13, 2017 01:21 AM2017-03-13T01:21:59+5:302017-03-13T01:21:59+5:30
सती नदीतील पाण्याची पातळी खालावत असल्याची सबब पुढे करीत कुरखेडा शहराला अपुरा नळ पाणीपुरवठा होत आहे.
विस्तृत चर्चा : शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ तहसीलदारांना भेटले
कुरखेडा : सती नदीतील पाण्याची पातळी खालावत असल्याची सबब पुढे करीत कुरखेडा शहराला अपुरा नळ पाणीपुरवठा होत आहे. असे सांगत नगर पंचायतीच्या काही पदाधिकाऱ्यांनी सती नदीतून मोटारपंपच्या सहाय्याने शेत जमिनीला होणारा पाणी पुरवठा बंद करावा, अशी मागणी केली होती. यावर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने थेट तहसीलदार अजय चरडे यांची भेट घेऊन आमचे धान व इतर पीक धोक्यात येईल. त्यामुळे सती नदीवरील शेती सिंचन बंद करू नका, अशी मागणी केली.
भाजपचे तालुकाध्यक्ष राम लांजेवार यांच्या नेतृत्वात सती नदी परिसरातील शेतकऱ्यांनी तहसीलदार अजय चरडे यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी सविस्तर चर्चा त्यांनी केली. कुरखेडा शहरात सती नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पाणी पुरवठ्याच्या विहिरीतून कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. चुकीच्या पध्दतीने पाणी योजनेच्या विहिरीचे बांधकाम अर्धवट करण्यात आले. अपेक्षीत खोलीकरण या विहिरीचे करण्यात आले नाही. त्यामुळे अपुरा पाणी पुरवठा होत आहे, असे लांजेवार यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)