अतिवृष्टीतील नुकसानीचा सर्वे करा
By admin | Published: September 30, 2016 01:32 AM2016-09-30T01:32:19+5:302016-09-30T01:32:19+5:30
मागील २० दिवसांपासून तालुक्यात अतिवृष्टी सुरू असल्यामुळे प्राणहिता व गोदावरी नदीला पूर आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : सिरोंचा आविसंची मागणी
सिरोंचा : मागील २० दिवसांपासून तालुक्यात अतिवृष्टी सुरू असल्यामुळे प्राणहिता व गोदावरी नदीला पूर आला आहे. यामुळे शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचा सर्वे करून शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघ शाखा सिरोंचाने तहसीलदारांच्या मार्फतीने जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून केलीे आहे.
प्राणहिता व गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठाजवळ तसेच सखल भागात असलेल्या शेकडो हेक्टर पिकांमध्ये पाणी साचले होते. मागील दोन ते तीन दिवस पीके पुराच्या पाण्यात होती. या पुरामुळे मिरची, कापूस, सोयाबीन, धान पिकांचे नुकसान झाले आहे. झिंगानूर, आसरअल्ली, कोपेला, कोरला, रमेशगुडम या भागातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय नसल्याने सदर शेतकरी वर्षातून एकदाच पीक घेतात. मात्र पुरामुळे येथीलही शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघाच्या मार्फतीने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदन देतेवेळी आविसं तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम, सल्लागार मल्ला शंकर, रवी सल्लम, ओमप्रकाश ताटीकुंडावार, श्याम बेजन्नीवार, बिरा आत्राम, लक्ष्मण बोल्ले, सडवली उमरी, मारोती गणपुरपू, नागराजू इंगीली, स्वामी जाकावार, राजेश इंगीली, रमेश इंगीली, सत्यम रापेली, राजन्ना पानेम, सुरेश येरकारी, हनुमंतू कोट्याला, नागेश्वरराव पगाडला, रामानंद मारगोणी, लक्ष्मण येल्ला, चंदू मंचार्ला, नरेश चरमी, समय्या चौधरी, राजू पानेम, श्रीनिवास घंटा, तिरूपती चिट्ट्याला आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)