शस्त्रक्रियेत डॉक्टर कुंभारेंनी फसवणूक केली

By admin | Published: September 25, 2016 01:45 AM2016-09-25T01:45:07+5:302016-09-25T01:45:07+5:30

गडचिरोली येथील चामोर्शी मार्गावरील धन्वंतरी या खासगी बड्या रूग्णालयाचे डॉ. अनंत शिवनाथ कुंभारे यांनी आपल्या आई सरस्वती शामसुंदर भोयर यांच्या मूत्राशयावर चुकीची शस्त्रक्रिया केली

Doctor fraud in surgery | शस्त्रक्रियेत डॉक्टर कुंभारेंनी फसवणूक केली

शस्त्रक्रियेत डॉक्टर कुंभारेंनी फसवणूक केली

Next

वामन भोयर यांचा आरोप : आईच्या मूत्राशयाचे केले आॅपरेशन
गडचिरोली : गडचिरोली येथील चामोर्शी मार्गावरील धन्वंतरी या खासगी बड्या रूग्णालयाचे डॉ. अनंत शिवनाथ कुंभारे यांनी आपल्या आई सरस्वती शामसुंदर भोयर यांच्या मूत्राशयावर चुकीची शस्त्रक्रिया केली व यासाठी आपल्याकडून भरपूर आर्थिक रक्कमही वसूल केल्याचा आरोप वामन शामसुंदर भोयर रा. कसरगाव ता. सावली जि. चंद्रपूर यांनी गडचिरोली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
वामन शामसुंदर भोयर यांनी या संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, ६ जुलै रोजी डॉ. अनंत शिवनाथ कुंभारे यांच्या खासगी धन्वंतरी क्लिनिकमध्ये माझ्या आईची सोनोग्राफी करण्यात आली. या सोनोग्राफीमध्ये ४ हजार ८७ एमएमची गाठ असल्याचे सांगून सदर गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे, असे डॉक्टर अनंत कुंभारे यांनी सांगितले. त्यानुसार १७ जुलै रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र शस्त्रक्रियेदरम्यान गाठ आढळून आली नाही. तर मूत्राशयातून तीन ते चार लिटर लघवी बाहेर काढण्यात आली.
औषधोपचार झाल्यानंतर २३ जुलै रोजी रूग्णालयातून सुटी करण्यात आली. घरी नेल्यानंतर नळीद्वारे लघवी काढणे सुरू होते. मात्र २४ ते २५ जुलैदरम्यान लघवी नळीद्वारे निघणे बंद झाले. त्यामुळे पुन्हा २६ जुलै रोजी रात्री १० वाजता डॉ. कुंभारे यांच्या रूग्णालयात आईला भरती करण्यात आले. डॉक्टरांनी दुसरी नळी बदलवून दिली. तेव्हापासून नळीद्वारेच लघवी काढणे सुरू झाले. आॅपरेशन झाल्यानंतरही प्रकृतीमध्ये कोणतीच सुधारणा झाली नाही. अजुनही नळीद्वारेच लघवी काढावी लागत आहे.
आॅपरेशन करून देण्याचा एकूण खर्च २२ हजार रूपये ठरविण्यात आला होता. मात्र २६ जुलै रोजी पुन्हा भरती केल्यानंतर डॉक्टर कुंभारे यांनी आणखी ६ हजार १०० रूपयांचा बिल तयार केला. मात्र तडजोड करून पाच हजार रूपये त्यांनी घेतले. सुरूवातीचे २२ हजार व नंतरचे पाच हजार असा एकूण २७ हजार रूपये रूग्णालयाचा खर्च व औषधांवरील खर्च पकडून आजपर्यंत लाख रूपये खर्च झाले आहेत. मात्र प्रकृती सुधारणा झाली नाही. डॉ. अनंत कुंभारे यांनी आपली फसवणूक केली आहे. त्याचबरोबर या कालावधीत आपल्याला बराच आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे डॉ. अनंत कुंभारे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी वामन भोयर यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केली आहे. (नगर प्रतिनिधी)

मागील दोन ते तीन वर्षांपासून सरस्वती भोयर यांना लघवी न होण्याचा त्रास होता. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून चार लिटर पाण्याचा गोळा बाहेर काढण्यात आला. शस्त्रक्रियेनंतरही किमान पाच ते सहा महिने नळीद्वारेच लघवी बाहेर काढावी लागली. हे आपण वामन भोयर यांना चांगल्या पध्दतीने समजावून सांगितले होते. सहा महिन्यानंतर मूत्राशयाचे आणखी आॅपरेशन करून छिद्र थोडा मोठा केला जाईल. त्यानंतर लघवी होणे सुरू होईल, असे सांगण्यात आले. सरस्वती भोयर या ६५ वर्षांच्या आहेत. म्हातारपणामुळे त्यांच्या मूत्राशयाच्या संवेदना संपल्या आहेत. त्या पुन्हा आणणे कठीण आहे. संवेदना संपल्या असल्याने लघवी लागली असल्याची जाणीव त्यांना होत नाही. शस्त्रक्रियेचा खर्च म्हणून २२ हजार रूपये आकारण्यात आले असले तरी शस्त्रक्रियेच्या मानाने तो खर्च अधिक नाही.
- डॉ. अनंत शिवनाथ कुंभारे, धन्वंतरी रूग्णालय गडचिरोली

Web Title: Doctor fraud in surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.