डॉक्टरांचा मोर्चा वडसा एसडीओ कार्यालयावर धडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2017 01:06 AM2017-03-24T01:06:26+5:302017-03-24T01:06:26+5:30
डॉक्टरांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्याच्या विरोधात देसाईगंज तालुक्यातील डॉक्टर संघटनेने उपविभागीय अधिकारी
हल्ल्यांचा केला निषेध : तत्काळ पाऊल उचलण्याची मागणी
देसाईग्ांज : डॉक्टरांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्याच्या विरोधात देसाईगंज तालुक्यातील डॉक्टर संघटनेने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर गुरूवारी मोर्चा काढला. यावेळी उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे यांना निवेदन देऊन हल्ल्याचा निषेध करण्यात आला. शासनाने डॉक्टरांना संरक्षण देण्यासाठी तातडीने पाऊल उचलावे, अशी मागणी तालुका डॉक्टर असोसिएशनने यावेळी केली.
शुल्लक कारणावरून रूग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना मारहाण करण्याच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रात सद्य:स्थितीत ५३ निवासी डॉक्टरांवर हल्ले झाले आहेत. वारंवार होत असलेल्या हल्ल्यामुळे रूग्णालयाचे वातावरण भितीदायक झाले आहे. डॉक्टरांना देखील रूग्णांना तपासण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र शासनाकडून कोणत्याही प्रकारचे प्रभावी पाऊल उचलण्यात आले नसल्याचे चित्र महाराष्ट्रात दिसून येत आहे. डॉक्टरांच्या आतापर्यत कोर्टात असलेल्या प्रलंबीत प्रश्नांबाबत सरकारने गंभीर दखल घ्यावी. तसेच डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा आदी मागण्यांचे निवेदन देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना देण्यात आले.
मोर्चात डॉक्टर असोसिएशन देसाईगंजचे अध्यक्ष डॉ. ए. बी. पाटील, सचिव डॉ. एम. एस. पटले, डॉ. सोहेल सामी, डॉ. हितेश जुमनाके, डॉ. अनिल नाकाडे, डॉ. मनिष भुसारी, डॉ. रवी मोटवानी, डॉ. आय. एन. टुटेजा, डॉ. चंद्रकांत नाकाडे, डॉ. महेश पापडकर, डॉ. एम. पी. सरकार, डॉ. के. वाय. बार, डॉ. सुर्यभान गभने, डॉ. चेतन नाकाडे, डॉ. विनोद नाकाडे, डॉ. पराग पांडव, डॉ. श्रीकांत बन्सोड, डॉ. जे. आर. भगत, डॉ. मिनाक्षी बुध्दे, डॉ. अमोल बुध्दे, डॉ. उमेश राउत, डॉ. संतोष खांडेलवाल आदी सहभागी झाले होते. (वार्ताहर)
काळ्या फिती लावल्या
हल्ल्याचा निषेध करण्यासाठी काळ्या रंगाच्या फित लावून डॉक्टर असोसिएशन देसाईगंजच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सर्व खाजगी डॉक्टरांनी दिवसभर रूग्णालय बंद ठेऊन निषेध व्यक्त केला. मात्र गंभीर रूग्णांसाठी दवाखाने सुरू करणार असल्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले.