शेतकऱ्यांनी बनविली कुत्र्याची गाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 05:00 AM2020-09-27T05:00:00+5:302020-09-27T05:00:36+5:30
शेतकऱ्याने जुन्या सायकलच्या दोन चाकांपासून एक छोटासा रिक्षा तयार केला. रिक्षाला कुत्र्याला जुंपन्याची व्यवस्था केली. सोबतच रिक्षावर स्वत:ला बसण्याची व्यवस्था केली. तेव्हापासून तो शेतकरी दररोज याच रिक्षाने कुत्र्याच्या मदतीने शेतापर्यंतचा दोन किमीचा प्रवास करीत आहे. शेतापर्यंतच्या प्रवासातून कुत्र्याला आनंद मिळत असल्याचे शेतकरी रोशन याने सांगितले.
विष्णू दुनेदार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुळशी : पशुपक्ष्यांचा मानवाशी अत्यंत घनिष्ठ व जिव्हाळ्याचा संबंध आहे. मानवाने स्वत:च्या उपजीविकेसाठी पशुपक्ष्यांचा उपयोग करून घेतला आहे. यापैकी एक पशु म्हणजे कुत्रा. घराची राखण करणारा व गुन्ह्याच्या तपासणीसाठी उपयुक्त ठरणारा इमानदार प्राणी अशी कुत्र्याची ओळख आहे. देसाईगंज तालुक्यातील एका शेतकºयासाठी शिस्तप्रिय व प्रामाणिक कुत्रा प्रवासाचे साधन ठरला आहे.
देसाईगंज तालुक्याच्या पिंपळगाव (हलबी) येथील शेतकरी रोशन मेश्राम यांनी आपल्या घरी जर्मन शेपर्ड जातीचे कुत्र्याचे पिल्लू पाळले. कुत्र्याचे पिल्लू अवघा एक महिन्याचे असल्यापासून त्यांनी त्याचे संगोपन केले व चांगली शिस्त लावली. कुटुंबात टॉमी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कुत्र्याला लहानपणापासूनच ते नित्यनेमाने सकाळी-संध्याकाळी शेतावर फिरायला घेऊन जायचे. आज टॉमी दोन वर्षाचा आहे. कुत्रा मोठा झाल्यावर मोटारसायकल सोबत त्याला लोखंडी साखळी बांधून घेऊन जायचे. यावेळी मात्र हा कुत्राच स्वत: मोटारसायकला ओढत न्यायचा. यामुळे पेट्रोलची बचत व्हायची. जर त्याला गाडी ओढू दिली नाही तर तो खूप भूंकायचा. ओढू दिली तर त्याला आनंद व्हायचा. हाच प्रकार त्याच्या सोबत सायकलने प्रवास करताना व्हायचा.
याच कल्पनेतून मग त्या शेतकऱ्याने जुन्या सायकलच्या दोन चाकांपासून एक छोटासा रिक्षा तयार केला. रिक्षाला कुत्र्याला जुंपन्याची व्यवस्था केली. सोबतच रिक्षावर स्वत:ला बसण्याची व्यवस्था केली. तेव्हापासून तो शेतकरी दररोज याच रिक्षाने कुत्र्याच्या मदतीने शेतापर्यंतचा दोन किमीचा प्रवास करीत आहे. शेतापर्यंतच्या प्रवासातून कुत्र्याला आनंद मिळत असल्याचे शेतकरी रोशन याने सांगितले.
अशी घेतो काळजी
सकाळीच कुत्र्याला बाहेर शौचास घेऊन जातो. रोज नित्यनेमाने आंघोळ घालतो. घरात जे शिजेल ते अन्न त्याला देतो. घरातील एक सदस्याप्रमाणे त्याची काळजी रोशन व त्याचे कुटूंबिय घेतात. प्राण्यावर जेवढे प्रेम कराल, तेवढेच प्रेम प्राणी करतात असा अनुभव रोशन कथन करतो.