दीड हजार लोकांना कुत्र्यांचा चावा
By admin | Published: July 14, 2016 01:14 AM2016-07-14T01:14:52+5:302016-07-14T01:14:52+5:30
गडचिरोली जिल्ह्यात कुत्र्यांची संख्या मोठी आहे. यामध्ये काही पाळीव तर काही मोकाट कुत्रे आहेत.
दीड वर्षात : एकही बळी नाही; आरोग्य विभागाची आकडेवारी
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कुत्र्यांची संख्या मोठी आहे. यामध्ये काही पाळीव तर काही मोकाट कुत्रे आहेत. मोकाट कुत्र्यांच्या हैदोसामुळे आजवर अनेक नागरिकांना रुग्णालयाचा रस्ता धरावा लागला. १ जानेवारी २०१५ ते जून २०१६ या दीड वर्षाच्या कालावधीत जिल्हाभरात तब्बल दीड हजार नागरिकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे. मात्र वेळीच औषधोपचार झाल्याने कुत्र्यांच्या चाव्यामुळे जिल्ह्यात एकही बळी गेला नाही, असे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
सन २०१५ वर्षाच्या जानेवारी महिन्यात मोकाट कुत्र्यांनी एकूण १०९ जणांना चावा घेतला. फेब्रुवारी महिन्यात १४२, मार्च महिन्यात ११६, एप्रिल महिन्यात १०४, मे महिन्यात १२० तर जून महिन्यात १२८ जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला. जुलै महिन्यात ७१, आॅगस्टमध्ये ८७, सप्टेंबरमध्ये ६१, आॅक्टोबरमध्ये १११, नोव्हेंबरमध्ये ९७, डिसेंबर महिन्यात १३० जणांना कुत्र्यांनी चावा घेतला. जानेवारी ते डिसेंबर २०१५ या वर्षभराच्या कालावधीत जिल्हाभरात एकूण १ हजार २७६ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला. या नागरिकांवर वेळीच औषधोपचार करण्यात आल्याने त्यांच्या आरोग्यात सुधारणा झाली व ते बचावले. जानेवारी ते जून २०१६ या सहा महिन्यांच्या कालावधीत २२४ वर नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला. मात्र या चालू वर्षातही कुत्र्याच्या चाव्यामुळे एकही जण जिल्ह्यात दगावला नाही.
गावठी उपचाराला मूठमाती
दहा वर्षांपूर्वी गावात एखाद्या नागरिकाला मोकाट कुत्र्याने चावा घेतल्यावर त्याला कुठल्याही शासकीय वा खासगी रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात येत नव्हते. जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात घरीच गावठी औषधोपचार केला जात होता. ज्याच्या घरच्या कुत्र्याने चावा घेतला, त्या घरची तेलमिश्रीत हळद आणून जखमेवर लावल्या जात होती. काही गावात जडीबुटी व वनस्पती जखमेवर लावली जात होती. कुत्र्याने चावा घेतलेले काही नागरिक वनौषधीचे सेवन करीत होते. मात्र याचा फारसा उपयोग होत नव्हता. त्यामुळे दहा वर्षांपूर्वी कुत्र्याच्या चाव्याने अनेकांचा बळीही गेला. मात्र त्यानंतर आरोग्य विभागाने प्रभावी जनजागृती केल्याने आता दहा वर्षांपासून शासकीय रुग्णालयात जाऊन औषधोपचार करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.