असहकार आंदोलन करणार
By admin | Published: October 15, 2015 01:48 AM2015-10-15T01:48:14+5:302015-10-15T01:48:14+5:30
२० सप्टेंबर २०१५ रोजी बिरसू आत्राम हा कामासाठी आलापल्लीत आला होता. गावाकडे परत जाताना सीआरपीएफ जवानाच्या गोळीबारात तो जखमी झाला.
अहेरी : २० सप्टेंबर २०१५ रोजी बिरसू आत्राम हा कामासाठी आलापल्लीत आला होता. गावाकडे परत जाताना सीआरपीएफ जवानाच्या गोळीबारात तो जखमी झाला. या घटनेसंदर्भात दोषी सीआरपीएफ पोलीस जवानांवर कारवाई करून जखमी आत्राम यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहेरी, एटापल्ली उपविभागातील आदिवासी बांधव असहकार आंदोलन करतील, असा एकमुखी ठराव मंगळवारी गट्टेपल्ली येथे घेण्यात आलेल्या ग्रामसभेत पारित करण्यात आला.
मंगळवारी गट्टेपल्ली येथे गट्टेपल्लीच्या पोलीस पाटीलांच्या अध्यक्षतेखाली अहेरी, एटापल्ली उपविभागातील पेसाअंतर्गत येणाऱ्या गावांची ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेला युवक काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष संतोष आत्राम, ज्येष्ठ नेते सैनू गोटा, बोटनपुंडीचे माजी सरपंच चतनू मडावी, सुधाकर तिम्मा, रामजी कत्तीवार, दौलत दहागावकर आदी उपस्थित होते. २० सप्टेंबर २०१५ रोजी पेरमिली येथे एका हातगाडीवर नाश्ता करून गावाकडे परत जात असताना बिरसू आत्राम यांच्यावर जंगलात लपून बसलेल्या सीआरपीएफ जवानांनी कोणतीही चौकशी न करता गोळीबार केला. यात आत्राम हे जखमी झालेत. सुदैवाने आत्राम बचावले. या घटनेसंदर्भात सीआरपीएफ पोलीस जवान व पेरमिली पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात यावी, अशा मागणीची लेखी तक्रार जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांच्याकडे २३ सप्टेंबर रोजी करण्यात आली. या तक्रारीला एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. मात्र या संदर्भात दोषी पोलिसांवर कोणतीही कारवाई झाली नाही.
केंद्र व राज्य सरकार हे आदिवासींच्या जीवनाविरोधी भूमिका स्वीकारल्याने सरकारचा निषेध म्हणून असहकार आंदोलन पुकारण्याचे मंगळवारच्या ग्रामसभेत सर्वानुमते करण्यात आले. निरपराध बिरसू आत्राम यांना न्याय मिळवून देण्यासाठी १० नोव्हेंबरपासून सरकार विरोधात लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असे ठरविण्यात आले. यावेळी गट्टेपल्ली येथील दलसू मडावी, झुरू मडावी, बाबुराव मडावी, मंगू मडावी, पोचा मडावी, विजय मडावी, बिरसू आत्राम आदींसह मोठ्यासंख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. (वार्ताहर)