कोरोनाकाळातही जिल्हाभरात कौटुंबिक हिंसाचार सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:08 AM2021-03-04T05:08:36+5:302021-03-04T05:08:36+5:30
बहुतांश प्रकरणांमध्ये पती-पत्नीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणातून निर्माण झालेले वाद हे या कौटुंबिक हिंसाचारामागील मुख्य कारण आहे. पतीकडून एखाद्या ...
बहुतांश प्रकरणांमध्ये पती-पत्नीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणातून निर्माण झालेले वाद हे या कौटुंबिक हिंसाचारामागील मुख्य कारण आहे. पतीकडून एखाद्या कारणावरून वारंवार भांडण करणे किंवा दारू पिऊन मारहाण करणे असे प्रकार अनेक दिवसांपासून सुरू आहेत; पण महिला अनेक दिवस हा अत्याचार सहन करत असल्याचेही या प्रकरणांत दिसून आले. पतीच्या वागण्यात फरक पडतच नाही आणि त्याचे वागणे असह्य झाल्यानंतरच महिला तक्रार करण्यासाठी पुढे सरसावते. पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेची पती किंवा सासू-सासऱ्यांविरूद्धची तक्रार घेतली जात असली तरी थेट गुन्हा दाखल न करता सामोपचाराने त्यांच्यातील वाद, गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न पोलीस ठाण्याच्या आवारातच असलेल्या समुपदेशन केंद्रामार्फत केला जातो. जिल्ह्यात गडचिरोलीसह देसाईगंज, चामोर्शी आणि अहेरी अशा चार ठिकाणी ही समुपदेशन केंद्र आहेत. त्या ठिकाणी प्रकरण मिटत नसल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा पातळी समुपदेशन केंद्रात हे प्रकरण पाठविले जाते. त्या ठिकाणीही समेट न झाल्यास त्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा सल्ला देऊन जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकाऱ्यांमार्फत संबंधित महिलेला कायदेशीर मदत व मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. काही प्रकरणे थेट महिला-बाल कल्याण अधिकाऱ्यांकडे येतात.
संशयी वृत्तीतून वाढत आहेत हिंसा
गडचिरोली जिल्ह्यात पती-पत्नीमध्ये नसलेली विश्वासाची भावना हे त्यांच्यातील वादाचे प्रमुख कारण असल्याचे दिसून येते. पत्नी बाहेरच्या एखाद्या व्यक्तीशी बोलली, त्याच्याकडे पाहून हसली किंवा मोबाइलवर एखाद्या व्यक्तीशी संवाद झाला तर पतीकडून संशय घेतला जातो. त्यात पतीला दारूचे व्यसन असेल तर पत्नीला मारहाण केली जाते. संशयाचे हे भूत त्यांच्या मनातून उतरत नाही म्हणून अखेर पोलीस ठाण्यापर्यंत प्रकरण पोहोचते, असे जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी नारायण परांडे यांनी सांगितले.
१० प्रकरणांत घडविला समेट
समुपदेशन केंद्रात गेल्या १४ महिन्यांत दाखल प्रकरणापैकी १० प्रकरणांत समेट घडवून आणण्यात संबंधितांना यश आले. पती-पत्नी किंवा कुटुंबीयांमध्ये नेमक्या कोणत्या कारणातून वाद होतो, त्यातून कोणी कुठे सुधारणा करण्याची गरज आहे. गैरसमज कसे दूर करावेत, कौटुंबिक विश्वास आणि प्रेमाची गरज का आहे, अशा विविध पद्धतीने समजावून सांगून त्यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जातो; पण अनेकवेळा ज्याच्याकडून अत्याचार होतात ती व्यक्ती तारखेवर हजरच होत नाही.