‘डोंगा’ हीच इंद्रावतीच्या बेटावरील त्या आदिवासींसाठी बुलेट ट्रेन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2021 05:00 AM2021-11-06T05:00:00+5:302021-11-06T05:00:43+5:30
महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांना विभागणाऱ्या इंद्रावती नदीच्या मधोमध बेटावर अनेक वर्षांपासून हे गाव वसले आहे. अहेरी तालुक्यात येत असलेल्या दामरंचा ग्रामपंचायतअंतर्गत या गावाचा समावेश होतो. मात्र मेट्रो, बुलेट ट्रेनच्या जमान्यात या गावातील माणसं अजूनही आदिम जीवन जगत असल्याचं वास्तव आहे. गाव बेटावर वसले असल्याने त्या ठिकाणी जाण्यासाठी ना रस्ता, ना पूल, ना मेट्रो, ना बुलेट ट्रेन आहे. आहे तो केवळ पारंपरिक डोंगा (छोटी नाव). हा डोंगाच आदिवासींसाठी बुलेट ट्रेन झाला आहे.
श्रीधर डुग्गीरालापाटी
लाेकमत न्यूज नेटवर्क
कमलापूर : ‘पुराच्या पाण्याने गावाचा संपर्क तुटला...’ असा हेडींगच्या बातम्या गेल्या कित्येक वर्षापासून दर पावसाळ्यात वाचायला मिळतात, पण बाराही महिने त्या गावाला पाण्याचा वेढा कायम असतो. साधं मोबाईलचं नेटवर्क नसेल किंवा बॅटरी 'लो' झाली की आपल्या जीवाची घालमेल सुरू होते. पण हे गाव तर कायमच संपर्काबाहेर असतं. अशा या गावातील लोक कसे राहात असतील आणि कसे जगत असतील? असा प्रश्न कोणालाही पडल्याशिवाय राहणार नाही. त्या गावाचे नाव आहे ‘कुर्ता’.
महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांना विभागणाऱ्या इंद्रावती नदीच्या मधोमध बेटावर अनेक वर्षांपासून हे गाव वसले आहे. अहेरी तालुक्यात येत असलेल्या दामरंचा ग्रामपंचायतअंतर्गत या गावाचा समावेश होतो. मात्र मेट्रो, बुलेट ट्रेनच्या जमान्यात या गावातील माणसं अजूनही आदिम जीवन जगत असल्याचं वास्तव आहे. गाव बेटावर वसले असल्याने त्या ठिकाणी जाण्यासाठी ना रस्ता, ना पूल, ना मेट्रो, ना बुलेट ट्रेन आहे. आहे तो केवळ पारंपरिक डोंगा (छोटी नाव). हा डोंगाच आदिवासींसाठी बुलेट ट्रेन झाला आहे. दामरंचावरून तीन किमी अंतर डोंगर, जंगलातून वाट काढत पार करावे लागते. इतके दिव्य पार केल्यानंतरही पायपीट संपत नाही. इंद्रावतीपर्यंत पोहोचले की, गावकऱ्यांनी स्वतः लाकडापासून तयार केलेल्या बोटीचा वापर करून जलप्रवास करण्याशिवाय पर्याय नाही. ही परिस्थिती बाराही महिने असते. इंद्रावती नदीचे पात्र मोठे असल्याने बाराही महिने पाणी असते. चारही बाजुने चमचमणारे पाणी, निसर्गरम्य वातावरणात वसलेलं हे गाव म्हणजे पर्यंटकांसाठी स्वर्गच. पण या धरतीवरच्या स्वर्गात जाण्यासाठी रस्ताच, गावातील घरांमध्ये वीज पुरवठाही नाही. गावात प्रवेश केल्यावर पडक्या झोपड्या, दोन-चार भांडी, दोन-चार पिशव्या, चुलीसाठी मांडलेले तीन दगड आणि काही कपडे दिसतात.
कुणी छत्तीसगडी, कुणी महाराष्ट्राचे रहिवासी
- गावात असलेल्या अवघ्या पाच ते सहा कुटुंबांशी संपर्क साधला असता काही नागरिकांकडे छत्तीसगड आणि काहींकडे महाराष्ट्राचे आधारकार्ड असल्याचे दिसून आले. काही आदिवासींना घरकुल मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. मात्र या ठिकाणी घर बांधकाम करायला साहित्य नेण्याची मोठी अडचण असल्याने आहे त्याच परिस्थितीत जीवन जगावे लागत आहे.
सरकार पुढाकार घेणार का?
मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी आदिवासी बांधव वास्तव्याने असून बाराही महिने त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने काही कुटुंबांनी हे गाव सोडल्याचे सांगितले जाते. उरलेले पाच ते सहा कुटुंब बाहेर का येत नाही असे विचारले असता 'आम्हाला जागा कोण देणार, शेती सोडून आल्यास उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार, शासनाने पुढाकार घेऊन मदत केल्यास आम्ही बाहेर येऊ' असे आदिवासी बांधवांनी सांगितलं. जगाच्या सानिध्यात आणि जवळ आणण्यासाठी या गावाचे पुनर्वसन करण्याची गरज आहे.