गाढवी नदी झाली कोरडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:09 AM2021-03-04T05:09:25+5:302021-03-04T05:09:25+5:30
विसोरा : विसाेरापासून अवघ्या ५०० मीटरवरून उत्तरेकडून पश्चिम दिशेला वळसा घालत दक्षिण वाहिनी होणाऱ्या गाढवी नदीचा पाणी प्रवाह ...
विसोरा : विसाेरापासून अवघ्या ५०० मीटरवरून उत्तरेकडून पश्चिम दिशेला वळसा घालत दक्षिण वाहिनी होणाऱ्या गाढवी नदीचा पाणी प्रवाह बंद झाला असून, उन्हाळी धानपीक तसेच रब्बी पीक आणि भाजीपाला पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसमोर संकट उभे झाले. गाढवी नदी कोरडी होण्यास मानवनिर्मित अडथळे कारणीभूत आहेत.
महाराष्ट्र राज्य तथा गोंदिया जिल्ह्याच्या पूर्व सीमेजवळील ढासगढ येथून उगम पावणारी आणि हजारो मीटर अंतर पार करून गडचिरोली जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या आरमोरी तालुक्यातील शिवणी येथे वैनगंगा नदीत विलीन होणारी गाढवी नदी विसोरा तसेच शेतकरी, नागरिकांची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते. गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यातून वाहताना दोन्ही किनाऱ्यावरील शेकडो हेक्टर शेतातील पिकांना पाणी पुरवते. गोंदिया, गडचिरोली हा घनदाट अरण्यप्रदेश असून, या भागात दरवर्षी चांगला पाऊस पडतो.
नदीच्या प्रवाहात काठावरच्या शेतांमध्ये पाणी पुरवण्यासाठी हजारो मोटारपंप लावले आहेत. मात्र, अर्जुनी तालुक्यातील गोठणगाव जवळच्या डोंगररांगांंच्या आड नदीचे पाणी अडवून इटियाडोह धरण बांधले आहे. त्यामुळे नदीचा पाणी प्रवाह अनियमित झाला आहे. पावसाळ्यात धो-धो पाऊस आल्यावरच धरणाचे पाणी ओव्हर होऊन नदीतील पाणी प्रवाह सुरू असतो. पाऊस थांबला की, पाण्याचा ओव्हरफ्लोसुद्धा थांबतो आणि नदी कोरडी होण्यास सुरुवात होते. पात्रातील पाण्याचा प्रवाह प्रभावित होतो. त्यामुळे काही ठिकाणी पात्र अरुंद झाले आहे. नदी काठावर झाडेझुडुपे वाढली आहेत.