पिकांसाठी गाढवी नदी ठरतेय जीवनदायिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:36 AM2021-04-01T04:36:47+5:302021-04-01T04:36:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जाेगीसाखरा : पाणी व सिंचनाची साधने असल्यास शेतकरी कधीही आर्थिकदृष्ट्या मागास राहात नाही. विविध प्रकारची पिके ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जाेगीसाखरा : पाणी व सिंचनाची साधने असल्यास शेतकरी कधीही आर्थिकदृष्ट्या मागास राहात नाही. विविध प्रकारची पिके घेऊन ताे आपली आर्थिक उन्नती साधताे. आरमाेरी तालुक्यात गाढवी, वैनगंगा या प्रमुख नद्यांसह नाले व ओढे आहेत. परंतु, जाेगीसाखरा परिसरात गाढवी नदीतील पाण्याचा सर्वाधिक वापर भाजीपाला, टरबूज, मका व कडधान्य पिकाच्या लागवडीसाठी करतात. त्यामुळे गाढवी नदी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असून, पिकांसाठी जीवनदायिनी ठरत आहे.
गाढवी नदी बारमाही वाहते. त्यामुळे नदीतील पाण्याचा वापर करून अनेकजण विविध पिके घेतात. त्यामुळे नदी किनाऱ्यावरील परिसर हिरवाकंच दिसताे. गाढवी नदीकिनारी जोगीसाखरा, पळसगाव, डोंगरगाव, उसेगाव, फरी, कासवी, आष्टा, रामपूर, कनेरी, अंतरजी आदी गावे आहेत. नदीलगत शेती असलेल्या शेतकऱ्यांनी मोटार पंप पाईपलाईन तयार करून आपल्या शेतापर्यंत पाण्याची व्यवस्था केली आहे. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फळे, भाजीपालावर्गीय पिके तसेच टरबूज शेती केली जात आहे. याशिवाय विटांचा व्यवसायदेखील नदीच्या पाण्यावरच केला जात असल्याने स्थानिक मजुरांना रोजगारही मिळत आहे. एवढेच नव्हे तर लगतच्या गावांना पिण्याच्या पाण्याची नळ योजना गाढवी नदीवरूनच कार्यान्वित केली आहे. गाढवी नदीवर इटियाडोह असल्याने उन्हाळी पिकांसाठी पाणी साेडले जाते. याचा फायदा आरमाेरी तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांना हाेताे. मात्र, नहर बंद झाले की, नदीचे पाणी लगेच कमी होते. तरीही गाढवी नदीत पाण्याची पातळी बऱ्यापैकी टिकून आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना विविध पिके घेण्यासाठी हाेत आहे. गाढवी नदीच्या उपकाराने जाेगीसाखरा परिसरातील शेतकरी सुखावला आहे.
बाॅक्स
बंधाऱ्यांची गरज
नदीतील पाणी उपसा करण्याचे प्रमाण वाढले, मात्र त्यामानाने गाढवी नदीचे पाणी जमिनीत भूगर्भामध्ये साठविण्यासाठीची व्यवस्था अजूनपर्यंत झाली नाही. त्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. यावर शासन-प्रशासनाने लक्ष देत ठिकठिकाणी बंधारे बांधणे व जमिनीत पाणी मुरण्यासाठी खड्डे खाेदणे आवश्यक आहे. तसेच नदीकिनारी असलेल्या गावांनी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन आपापल्या स्तरावरून भूगर्भात जास्तीत-जास्त पाणी साठवून जलपातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.