रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार देणारे हात व्हावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2022 10:38 PM2022-10-02T22:38:35+5:302022-10-02T22:40:08+5:30

स्थानिक गाेंडवाना विद्यापीठाच्या ११ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून २ ऑक्टाेबर राेजी रविवारला विद्यापीठातर्फे  उत्कृष्ट महाविद्यालय, शिक्षक, विद्यार्थी तसेच कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देऊन गाैरविण्यात आले. विशेष म्हणजे समाजसेवक मोहन हिराबाई हिरालाल यांना त्यांच्या समाजातील अतुलनीय सेवेबद्दल मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन विद्यापीठाच्या ‘जीवन साधना गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Don't be a job seeker but a job giver! | रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार देणारे हात व्हावे!

रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार देणारे हात व्हावे!

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिराेली व चंद्रपूर जिल्ह्यातील विपूल साधनसंपत्तीचा वापर केला पाहिजे. विद्यार्थ्यांना जंगल आणि त्यातील गुणधर्म या विषयावर शिक्षण दिले पाहिजे, जेणेकरून ते रोजगार शोधणारे नव्हे तर ते रोजगार देणारे हात होतील. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे. मोठे शास्त्रज्ञ हे त्यांचे आदर्श असावेत. त्यांनी स्वतःला इतरांपेक्षा कमी समजू नये. माणसाची ओळख त्याच्या जातीने किंवा धर्माने नव्हे तर त्याच्या शिक्षणाने झाली पाहिजे, असे प्रतिपादन अकाेला येथील डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.शरद निंबाळकर यानीं यावेळी केले. 
स्थानिक गाेंडवाना विद्यापीठाच्या ११ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून २ ऑक्टाेबर राेजी रविवारला विद्यापीठातर्फे  उत्कृष्ट महाविद्यालय, शिक्षक, विद्यार्थी तसेच कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देऊन गाैरविण्यात आले. विशेष म्हणजे समाजसेवक मोहन हिराबाई हिरालाल यांना त्यांच्या समाजातील अतुलनीय सेवेबद्दल मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन विद्यापीठाच्या ‘जीवन साधना गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी विशेष अतिथी म्हणून ते बाेलत हाेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे होते. विशेष अतिथी म्हणून डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.शरद निंबाळकर तर प्रमुख अतिथी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन आदी मान्यवर उपस्थित हाेते.
याप्रसंगी मोहन हिराबाई  हिरालाल म्हणाले, महात्मा गांधींनी सांगितलेली अहिंसा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली समता ही दडपल्या गेलेल्या समाजाला पुढे नेण्यासाठी सहसंबंधित साधने आहेत.  या दोन गोष्टी वेगळ्या आहेत असे म्हणणे चुकीचे आहे.  या दोन्ही नेत्यांना मानवतेच्या आधारे समाजात बदल हवा होता.  हे विचार पुढे नेण्याची गरज आहे. लेखामेंढा गावाचा त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. दिल्ली, मुंबईत आमचं सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार घोषणा देऊन अमलात आणणारं लेखामेंढा गाव आहे. मला या गावापासून खूप शिकायला मिळाले. जगाला एक नवी वाट दाखवून देण्याचे काम हे गाव करीत आहे असे म्हणत समाजसेवक देवाजी तोफा यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केलं.
यावेळी खा. अशोक नेते व आ. डॉ. देवराव होळी यांनी गाेंडवाना विद्यापीठाच्या विकासासाठी आवश्यक ते प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
डॉ. शिल्पा आठवले यांनी मोहन हिराबाई हिरालाल यांच्या मानपत्राचे वाचन केले. प्रास्ताविक डॉ.श्रीराम कावळे, संचालन डॉ.नरेंद्र आरेकर यांनी केले  तर आभार डॉ.अनिल हिरेखण यांनी मानले. कार्यक्रमाला प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

यांचा झाला पुरस्काराने गाैरव 
उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर तर उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार डॉ. अमिर. धम्मानी, ग्रामगीता महाविद्यालय चिमूर यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार डॉ. श्रीराम गहाणे, आदर्श कॉलेज देसाईगंज आणि डॉ. अपर्णा धोटे, निळकंठराव शिंदे कॉलेज, भद्रावती जि.चंद्रपूर, उत्कृष्ट विद्यापीठ कर्मचारी पुरस्कार (वर्ग ३) मनिषा फुलकर, (वर्ग ४) अनिल  चव्हाण ,गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार (विद्यापीठ संलग्निक महाविद्यालये) प्रमोद नागापुरे ,आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा जि.चंद्रपूर, उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार विशाल शिंडे, डॉ. आंबेडकर महाविद्यालय,चंद्रपूर, उत्कृष्ट विद्यार्थीनी पुरस्कार प्रियंका  दिघोरे , नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय, ब्रम्हपूरी यांचाही गाैरव करण्यात आला. याशिवाय उत्कृष्ट रासेयाे कार्यक्रम अधिकारी तसेच वार्षिकांक पुरस्कार प्रदान करून शिक्षक व विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

विद्यापीठात लवकरच सकारात्मक बदल हाेतील -डाॅ.बाेकारे
गडचिरोली जिल्ह्याला बाहेरचे लोक मागास म्हणतात; पण खरं पाहता हा सगळ्यात प्रगत असा भाग आहे आणि इथे समृद्ध असे जंगल आहे. एखादे बी पेरल्यानंतर त्याची फळे आणि फुले फळाला येतात तसेच विद्यापीठाचे फळे आता आपल्याला दिसायला लागतील, प्रतिपादन गाेंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी केले. पुढे ते म्हणाले, येथील प्राध्यापकांनी अगदी तळागाळातल्या भागात संपर्क अभियान राबवले. त्याचंच फलित म्हणजे ११०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर काेर्सेसला मोफत प्रवेश घेतला आहे. काही महिन्यातच विद्यापीठात अनेक सकारात्मक बदल  होऊन राष्ट्रीय स्तरावर  विद्यापीठाचा नावलौकिक होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

 

Web Title: Don't be a job seeker but a job giver!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.