नक्षलवाद्यांना मदत करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 12:15 AM2019-08-03T00:15:44+5:302019-08-03T00:16:09+5:30
नक्षलवादी विकास कामांना विरोध करतात. त्यामुळे भामरागड तालुक्यातील नागरिकांनी नक्षलवाद्यांना मदत करून आपले जीवन उद्ध्वस्त करू नये, असे आवाहन भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : नक्षलवादी विकास कामांना विरोध करतात. त्यामुळे भामरागड तालुक्यातील नागरिकांनी नक्षलवाद्यांना मदत करून आपले जीवन उद्ध्वस्त करू नये, असे आवाहन भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी केले.
नक्षल सप्ताहादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी पोलीस व महसूल प्रशासनाच्या वतीने भामरागड येथे मंगळवारी जनमैत्री मेळावा घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार कैलास अंडिल, नायब तहसीलदार निखील सोनवने, भामरागडच्या नगराध्यक्ष संगीता गाडगे, नगरसेविका शारदा कंबगोनीवार, भामरागड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भांड, गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवने तसेच सीआरपीएफचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार अंडिल म्हणाले, शासनामार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनेच्या माध्यमातून तालुक्याच्या ग्रामीण भागात आरोग्यसेवा, शिक्षण व इतर सेवा पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. नागरिकांनी आपल्या समस्या प्रशासनापुढे मांडाव्या तसेच रस्ता व इतर विकास कामांसाठी नागरिकांनी पुढे येणे गरजेचे आहे, असे सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला आलेल्या नागरिकांची तसेच आदिवासी बांधवांची भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यशस्वीतेसाठी पोलीस निरीक्षक संदीप भांड, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर झोल, होनमने, सूरज सुसतकर तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. दरम्यान पुरामध्ये अडकलेल्या लोकांसाठी पोलीस विभागाच्या वतीने कार्यक्रमस्थळी भोजनाची व्यवस्था करण्यात आली.