'तरूणांनो, नक्षलवादी बनू नका'; ठार झालेल्या नक्षली कमांडरच्या काकांचं आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 08:42 PM2018-04-24T20:42:03+5:302018-04-24T20:46:55+5:30

रविवारी झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांचा कमांडर साईनाथ ठार झाला

don't join naxal movement uncle of dead naxal commander appeals to youth | 'तरूणांनो, नक्षलवादी बनू नका'; ठार झालेल्या नक्षली कमांडरच्या काकांचं आवाहन

'तरूणांनो, नक्षलवादी बनू नका'; ठार झालेल्या नक्षली कमांडरच्या काकांचं आवाहन

googlenewsNext

गडचिरोली : साईनाथ नक्षलवादी चळवळीत सामील झाला. मात्र त्यामुळे त्याच्या कुटुंबाची पूर्ण वाताहत झाली. त्यामुळे तरुणांनो, नक्षलवादी बनू नका, असं आवाहन साईनाथच्या काकांनी केलं. साईनाथ ऊर्फ डोलेश मादी आत्राम हा नक्षलवाद्यांचा डीव्हीसी कमांडर रविवारी झालेल्या चकमकीत मारला गेला. त्याच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या काकांच्या ताब्यात देण्यात आला. 

'साईनाथ नक्षली चळवळीत सहभागी झाल्याच्या चिंतेत त्याच्या वडिलांनी मृत्यूला कवटाळलं. त्यानंतर त्याची आई निराधार झाली. तिचं संपूर्ण आयुष्य साईनाथच्या आठवणीत गेलं. साईनाथ नक्षली चळवळीत सहभागी झाल्यानं त्याच्या कुटुंबाची पूर्णपणे वाताहत झाली. नक्षली चळवळीत सहभागी झालेल्या प्रत्येक सदस्याच्या कुटुंबाची जवळपास अशीच स्थिती असून तरूणांनी नक्षल चळवळीमध्ये सहभागी होऊ नये,' असं कळकळीचं आवाहन साईनाथचे काका डुंगा आत्राम व बिरसू आत्राम यांनी केलं.

भामरागड तालुक्यातील कसनासूर जंगल परिसरात २२ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत डीव्हीसी कमांडर साईनाथ मारला गेला. त्याची ओळख पटल्यानंतर त्याचा मृतदेह सुपूर्द करण्यासाठी त्याच्या दोन्ही काकांना पोलिसांनी गडचिरोलीत बोलवलं. साईनाथचा मृतदेह बघून दोन्ही काकांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यावेळी त्यांनी साईनाथची हकीकत सांगितली. 'साईनाथ जवळपास १५ वर्षांचा असताना नक्षलवादी गावात आले. त्यांनी साईनाथला फुस लावून पळवून नेलं. नक्षलवाद्यांच्या शस्त्रांपुढे साईनाथचे आईवडील काहीच करू शकले नाहीत. साईनाथच्या चिंतेमुळे अगदी दोन वर्षातच वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर आई पूर्णत: निराधार झाली,' असं साईनाथच्या काकांनी सांगितलं. साईनाथनं केलेली चूक इतर तरुणांनी करु नये, असं आवाहनही त्यांनी केलं. 
 

Web Title: don't join naxal movement uncle of dead naxal commander appeals to youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.