नशापान करून मतदान करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:30 AM2021-01-04T04:30:11+5:302021-01-04T04:30:11+5:30
गडचिरोली : सध्या ग्रामपंचायत निवडणूक दारूमुक्त होणे आवश्यक आहे. आदर्श गाव निर्मिती करण्यासाठी गावाचा सरपंच, सदस्य निर्व्यसनी असणे गरजेचे ...
गडचिरोली : सध्या ग्रामपंचायत निवडणूक दारूमुक्त होणे आवश्यक आहे. आदर्श गाव निर्मिती करण्यासाठी गावाचा सरपंच, सदस्य निर्व्यसनी असणे गरजेचे आहे. अन्यथा गाव अधोगतीकडे वाटचाल करते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक दारूमुक्त करावी. नशेत बुडून अयोग्य उमेदवाराची निवड करू नका, असे आवाहन जिल्हा दारूमुक्ती संघटनेचे उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा यांनी केले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांदरम्यान गावागावात दारू पिणारे, पाजणारे निवडून येण्याचा प्रयत्न करतील. जिल्ह्यात ग्रामपंचायतींचा कारभार चांगला चालण्यासाठी सरपंच व सदस्य निर्व्यसनी असणे आवश्यक आहे. म्हणून ‘दारूमुक्त ग्रामपंचायत निवडणूक’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. आदिवासी जनतेने दारूच्या आमिषाला बळी न पडता योग्य उमेदवारांची निवड करावी. अन्यथा तो उमेदवार पाच वर्षांमध्ये संपूर्ण गावाचे वाटोळे करील.
निवडणुकीदरम्यान दारूविक्री बंद असलेल्या गावातसुद्धा दारूचा शिरकाव होण्याची शक्यता आहे. उमेदवारांनीसुद्धा निवडून येण्यासाठी दारूचे वाटप करणार नाही, असा संकल्प करावा. तसेच दारूचे आमिष देणाऱ्यांना आम्ही निवडून देणार नाही, असा निर्धार मतदारांनी करावे, असे आवाहन तोफा यांनी केले आहे.