दिना नदीवरील पुलाअभावी दुप्पट प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:23 AM2021-07-12T04:23:11+5:302021-07-12T04:23:11+5:30
चामोर्शी : गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात रस्त्यांचा विकास होताना दिसत आहे; मात्र चामोर्शी-एटापल्ली व्हाया घोट-देवदा या मार्गावर अडसर असलेल्या ...
चामोर्शी : गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात रस्त्यांचा विकास होताना दिसत आहे; मात्र चामोर्शी-एटापल्ली व्हाया घोट-देवदा या मार्गावर अडसर असलेल्या देवदा जवळील दिना नदीवरील पूल जिल्हा निर्मितीला ३९ वर्षे होऊनही अद्यापही बांधण्यात आला नाही. घाेट-रेगडी-एटापल्ली हे अंतर ६८ किमी आहे. परंतु याच मार्गावरील देवदालगतच्या दिना नदीवर पूल नसल्याने नागरिकांना आष्टी-आल्लापल्ली मार्गे एटापल्लीला ११२ कि.मी.चे अंतर प्रवास करून जावे लागते. पुलाअभावी जवळपास दुप्पट प्रवास करावा लागताे.
गडचिराेली जिल्हा निर्मितीला ३९ वर्षे पूर्ण होऊन ऑगस्ट महिन्याच्या २६ तारखेला जिल्हा चाळिसाव्या वर्षात पदार्पण करणार आहे. तरी जिल्ह्यातील काही भाग अद्यापही रस्ते विकासात मागे आहे. त्यातच चामोर्शी व्हाया घोट-एटापल्ली या ६८ कि.मी. मार्गावर घोट, निकतवाडा, नवेगाव, पोतेपल्ली, माडे आमगाव, पुसगुड्डा, रेगडी, देवदा, बोलेपल्ली, चंदनवेली, गेदा, जीवनगट्टा, एटापल्ली अशी जवळपास १२ गावे येतात. एटापल्लीकडून गडचिरोलीकडे जाणारे वाहनधारक जवळचा मार्ग म्हणून घोट-पोटेगाव मार्गांने जातात. या मार्गावरील देवदा जवळील दिना नदीवर पूल बांधकामाकडे संबधित विभागाचे दुर्लक्ष का हाेत आहे, असा सवाल नागरिक करीत आहेत. यापूर्वी अनेकदा या नदीवर पूल बांधण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली. परंतु दुर्लक्षच झाले. देवदा परिसरातील नागरिकांना एटापल्ली येथे तर नदीपलीकडच्या गावातील नागरिकांना चामाेर्शी येथे येण्यासाठी ४४ कि.मी. चे अधिक अंतर पार करून प्रवास करावा लागताे. यात त्यांना मानसिक त्रासासह आर्थिक भुर्दंड सहन लागत आहे. नागरिकांचा त्रास वाचविण्यासाठी देवदालगतच्या दिना नदीवर पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
बाॅक्स
नदीवरील घाट अवघड
आल्लापल्ली-आष्टी मार्गाचे अंतर अधिक असल्याने वाहनधारक या जवळच्या मार्गाचा वापर करतात. मात्र पावसाळ्यात या नदीवरील घोट बाजूचा घाट अवघड आहे. घाट दुरुस्त नसल्यामुळे जीव मुठीत घेऊन वाहने हळूहळू चालवावी लागतात. इतर ऋतूत हा मार्ग वाहनधारकांना परवडण्यासारखा असल्याने वाहनधारक याच मार्गाचा वापर करतात. नाल्यातून पाणी वाहत असल्यास वाहतूक बंद असते. पाणी नसल्यास दुचाकी, चारचाकी व मालवाहू वाहने याच मार्गाचा वापर करतात.
090721\01191347img-20210709-wa0084.jpg
देवदा नाला फोटो