डॉ. राणी बंग यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2022 06:52 PM2022-02-23T18:52:46+5:302022-02-23T18:53:37+5:30
Gadchiroli News महाराष्ट्र शासनाच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने शिक्षणशास्त्रासाठी देण्यात येणारा कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या तथा ‘सर्च’च्या संचालिका डॉ. राणी बंग यांना प्रदान करण्यात आला आहे.
गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने शिक्षणशास्त्रासाठी देण्यात येणारा कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या तथा ‘सर्च’च्या संचालिका डॉ. राणी बंग यांना प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या ‘तारुण्यभान’ या पुस्तकासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र विषयात वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर डॉ. राणी बंग यांनी एम.पी.एच. पदवी यूएसए येथील जॉन हॉपकिन्स विद्यापीठातून घेतली. १९८६ पासून गडचिरोली या आदिवासीबहुल जिल्ह्यात त्यांचे वैद्यकीय सेवा कार्य सुरू आहे. दारूबंदी चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. लैंगिक शिक्षण प्रसारासाठी त्यांनी महाराष्ट्रात अनेक शिबिरांचे आयोजन केले आहे. त्यांनी ‘ग्रामीण स्त्रीचे प्रजनन आरोग्य’ या विषयांवर आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधन केले आहे.
कोरोनाच्या अडचणीमुळे हा पुरस्कार वितरण सोहळा मुंबईत होऊ शकला नाही. त्यामुळे मंडळाच्या वतीने डॉ. मुजफ्फर लकडावाला यांच्या हस्ते सदर पुरस्कार सर्च येथे प्रदान करण्यात आला.