गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रशांत बोकारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 12:56 PM2021-12-09T12:56:32+5:302021-12-09T13:07:37+5:30

राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी बुधवारी डॉ. बोकारे यांची गोंडवाना विद्यापीठाचे नवीन कुलगुरू म्हणून नियुक्ती केली. डॉ. बोकारे यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे.

dr. prashant bokare is the new vice chancellor of gondwana university gadchiroli | गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रशांत बोकारे

गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रशांत बोकारे

googlenewsNext

गडचिरोली : येथील गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी ओ. पी. जिंदाल विद्यापीठ रायगड (छत्तीसगड) येथील स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे अधिष्ठाता असलेले डॉ. प्रशांत बोकारे यांची नियुक्ती करण्यात आली. विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी त्यांची नियुक्ती केली आहे.

तब्बल सव्वा वर्षापासून, म्हणजे ७ सप्टेंबर २०२० रोजी कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त होते. रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

डॉ. प्रशांत बोकारे यांनी सांगली येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय सांगली येथून स्थापत्य अभियांत्रिकी ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी नागपूर येथील व्हीआरसीई येथून एम.ई. ही पदव्युत्तर पदवी, तर आयआयटी गुवाहाटी येथून पीएच.डी. प्राप्त केली.

डॉ. बोकारे यांनी बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय सेवाग्राम (वर्धा) येथे तसेच रुंगटा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय येथे प्राध्यापक व प्राचार्य पदावर काम केले आहे.

कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी अलाहाबाद उच्च न्यायालयातील सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित केली होती. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदोर येथील संचालक प्रा. हिमांशू राय व शासनाचे प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता या समितीचे सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. बोकारे यांची नियुक्ती जाहीर केली.

Web Title: dr. prashant bokare is the new vice chancellor of gondwana university gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.