कॉम्प्लेक्स परिसरातील नाल्यांचा उपसा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:27 AM2021-06-04T04:27:52+5:302021-06-04T04:27:52+5:30
गडचिरोली : कॉम्प्लेक्स परिसरातील नाल्यांचा उपसा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. कॉम्प्लेक्स परिसर विस्ताराने फार मोठा ...
गडचिरोली : कॉम्प्लेक्स परिसरातील नाल्यांचा उपसा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. कॉम्प्लेक्स परिसर विस्ताराने फार मोठा आहे. त्यामुळे या ठिकाणी जादा मजूर लावण्याची आवश्यकता आहे. विसापूर भागातही नाली स्वच्छतेचे काम करण्याची आवश्यक आहे.
एकेरी वाहतुकीबाबत हालचाली नाहीत
गडचिरोली : गडचिरोली शहरातील मुख्य बाजारपेठ त्रिमूर्ती चौकातून आठवडी बाजाराकडे जाणाऱ्या मार्गावर आहे. सणासुदीच्या कालावधीत व आठवडी बाजारादिवशी रविवारी या मार्गावर वाहनधारकांची प्रचंड गर्दी असते. अनेकदा वाहतुकीची कोंडी होते.
वाहनांच्या गतीला आवर घाला
सिरोंचा : येथील प्रमुख मार्गांवर भरधाव वाहनांमुळे पहाटेच्यावेळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना अपघाताचा धोका होऊ शकतो. त्यामुळे वळण मार्गावर गतिरोधक लावून वाहनांच्या गतीला आवर घालण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
रांगी गावालगत गतिरोधक निर्माण करा
रांगी : येथील बसथांब्यापासून मोहलीकडे जाणाऱ्या मार्गावर गतिरोधक उभारणे आवश्यक आहे. गतिरोधक नसल्याने वाहने भरधाव वेगाने हाकली जातात. या मार्गावर अपघाताची शक्यता बळावली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
आरमोरी मार्गावरील अनेक पथदिवे बंद
गडचिरोली : आरमोरी मार्गावरील अनेक पथदिवे बंद पडले आहेत. हे पथदिवे सुरू करणे आवश्यक आहे. मात्र, नगरपरिषदेचे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करतात. आरमोरी मार्गावर अनेक नागरिक पहाटे व रात्री जेवण झाल्यानंतर फिरण्यासाठी जातात. त्यामुळे या मार्गावरील पथदिवे दुरुस्त करणे आवश्यक आहे. याकडे नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
अहेरी आगाराला नव्या बसगाड्या द्या
अहेरी : अहेरी हे राज्यातील सर्वांत जुने एसटी आगार आहे. येथून लांब पल्ल्याच्याही अनेक गाड्या जातात. मात्र, बहुतांश गाड्या जुनाट आहेत. त्यामुळे वारंवार नादुरुस्त होत आहे. येथून आंतरराज्यीय बससेवाही चालविली जाते. गडचिरोली व अहेरी आगाराला नव्या मोजक्या बसेस काही महिन्यांपूर्वी उपलब्ध करून देण्यात आल्या; मात्र त्याही अपुऱ्या आहेत. बसगाड्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे.
मजुरी कमी असल्याने आर्थिक अडचण
चामाेर्शी : कोरोनामुळे यावर्षी बांधकाम क्षेत्र प्रभावित झाले आहे. अनेकांनी घर बांधकाम करण्याचा बेतही पुढे ढकलता आहे. मात्र ज्या ठिकाणी बांधकामे सुरू आहेत, तेथे मजुरांना अत्यल्प मजुरी दिली जात असल्यामुळे मजुरी वाढवून देण्याची मागणी कामगारांनी केली आहे.
केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा
आरमाेरी : पंतप्रधान जनधन योजना, प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना, पीकविमा योजना, प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना, समृद्धी सुकन्या योजना, उज्ज्वला गॅस योजना आदी योजना राबविल्या जात आहेत. मात्र अनेकांना या योजनांची माहिती नसल्याने गरीब लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने अधिकाधिक जनजागृती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
ग्रामीण भागातील घरकुल बांधकाम रखडले
देसाईगंज : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शेकडो नागरिकांना घरकुल मंजूर झाले. परंतु पंचायत समितीच्या नियोजनामुळे धनादेश मिळाले नाहीत. शेकडो लाभार्थी घरकुलासाठी पंचायत समितीचे उंबरठे झिजवित आहेत. मात्र, धनादेश मिळाला नाही. काही व्यक्तींची नावे चुकीने वगळण्यात आली. दरम्यान, कोरोनामुळे टाळेबंदी लागल्याने प्रशासकीय कामे ठप्प झाली. त्यामुळे घरकुल बांधकामे निधीअभावी रखडली आहेत.
रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा कोलमडली
एटापल्ली : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मूलभूत आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना खासगी डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आली आहे़. बहुतांश जनता शेतीवर अवलंबून आहे़. आर्थिक परिस्थितीमुळे खासगी रुग्णालयात जाणे शक्यच नाही़. शासनाकडून आरोग्य केंद्रांना मोठा निधी दिला जात आहे़; पण, मूलभूत सुविधा मिळत नसल्याने रुग्ण हैराण झाले आहेत.
वाहनधारकांना शिस्त लावणे गरजेचे
गडचिराेली : शहराची मुख्य बाजारपेठ त्रिमूर्ती चाैकात असून, अनेक दुकाने आहेत. परंतु काही ग्राहक स्वत:ची वाहने पार्किंगमध्ये न ठेवता रस्त्यावरच लावतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. संबंधित विभागाने रस्त्यावरील पार्किंग हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यासाठी निवेदनही दिले आहे. मात्र उपाययोजना करण्यात आली नाही.
ग्रामीण भागात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ
धानाेरा : जंगलव्याप्त ग्रामीण भागात वन्यप्राणी धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर जागून शेताचे रक्षण करावे लागत आहे. त्यातच वाघ-बिबट्यासारख्या हिंस्र प्राण्यांमुळेही शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे त्यांना शेतातील कामे करणेही कठीण झाले आहे. त्यावर उपाय करण्याची मागणी केली आहे.
नाल्यातील गाळ काढण्याची मागणी
गडचिराेली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता आहे. या नाल्यांवर कोणतेच अच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात. त्यामुळे दुरुस्ती करून गाळ काढण्याची मागणी केली जात आहे.
शासकीय योजनेपासून बचतगट वंचित
काेरची : ग्रामीण भागातील पुरुष व महिला बचतगटाच्या माध्यमातून प्रगती साधत आहेत. त्यांच्याकरिता शासनाने स्वतंत्र विभाग निर्माण केला आहे. या माध्यमातून विकासाची दालने खुली झाली आहेत. परंतु शासकीय योजनेपासून बचतगट वंचित आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
डुकरांच्या बंदोबस्ताची मोहीम थंडावली
गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली शहरातील सर्व २३ वॉर्डात डुकरांचा हैदोस प्रचंड वाढला आहे. मात्र पालिकेच्यावतीने डुकरांच्या बंदोबस्ताकरिता काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आलेली मोहीम थंडबस्त्यात असल्याचे दिसून येते. पालिका प्रशासनाचे डुकरांच्या हैदोसाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. माेकळ्या जागेत डुकर दिवसभर बसून हैदाेस माजवितात.
वीज उपकेंद्रांचे काम पूर्ण करा
आरमोरी : अतिदुर्गम व ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो. अनेकदा २ ते ३ दिवसांपर्यंत तो सुरळीत होत नाही. परिणामी शेतकरी, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. वीज उपकेंद्र निर्माण झाल्यास वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.
मालेवाडा पीएचसीला रुग्णालयाचा दर्जा द्या
कुरखेडा : मालेवाडा परिसर आजही शासन व प्रशासनाच्या नजरेत दुर्लक्षित आहे. या भागात ५० किमीच्या परिसरात केवळ एकाच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी आहे.
मार्गालगत वाहने ठेवणाऱ्यांना अभय
गडचिरोली : शहरातील चारही मुख्य महामार्गांच्या बाजूला ट्रक व इतर वाहने उभी ठेवली जातात. अनेकांकडे जागा नसतानाही वाहने खरेदी केली आहेत. रात्रंदिवस रस्त्यावर वाहने राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
स्मशानभूमीत पाणी सुविधेचा अभाव
कुरखेडा : जि. प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली, तरी ग्रामीण भागातील अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून, स्मशानभूमीत जाण्यासाठी चांगला रस्तादेखील नाही. पावसाळ्याच्या दिवसात आणखी हाल हाेणार आहेत.
स्टेडियम परिसरात होमगार्ड तैनात करा
गडचिरोली : सायंकाळच्यासुमारास शहरातील अनेक महाविद्यालयीन युवक, युवती शारीरिक चाचणीचा सराव करण्यासाठी जिल्हा स्टेडियमवर जात आहेत. तसेच रात्रीचे भोजन आटोपल्यानंतर या भागातील अनेक नागरिक व महिला स्टेडियमकडे फिरावयास जातात. त्यामुळे पोलीस प्रशासनाने सायंकाळच्यासुमारास होमगार्ड तैनात करावे, अशी मागणी आहे.
गोलाकर्जी मार्गाची दुरुस्ती करा
अहेरी : तालुक्यातील राजाराम खांदला रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांची तात्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी या परिसरातील वाहनधारक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.
बीएसएनएलचे टॉवर वाढविण्याची मागणी
अंकिसा : दुर्गम भागात बीएसएनएलचे अत्यंत कमी टॉवर आहेत. त्यामुळे या परिसरातील भ्रमणध्वनींना कव्हरेज मिळत नाही. रेगडी, नवेगाव भागात कव्हरेज पोहोचत नसल्याने टॉवरचा रेंज वाढवावा. तसेच नवीन टॉवरची निर्मिती करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
अहेरी शहरातील अतिक्रमण काढा
अहेरी : शहरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने हे अतिक्रमण तात्काळ काढावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यापूर्वीही अनेकदा मागणी करण्यात आली; मात्र दुर्लक्षच झाले आहे.
अंगणवाड्या भरतात भाड्याच्या खोलीत
देसाईगंज : जिल्हाभरातील १०० वर अंगणवाड्यांना स्वत:ची इमारतच नाही. त्यामुळे या अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत भरविल्या जात आहेत. शहरात अत्यंत लहान व कौलारू खोलीत अंगणवाडी चालविली जात आहे. बहुतांश मिनी अंगणवाड्यांना इमारत उपलब्ध नाही.
ठेंगण्या व अरुंद पुलाचा प्रश्न कायमच
आलापल्ली : ब्रिटिश काळात बांधलेला एकही पूल गडचिरोली जिल्ह्यात नसला, तरी देशाच्या स्वातंत्र्यानंतर तयार करण्यात आलेला चंद्रपूर-आलापल्ली मार्गावरील आष्टीचा पूल ठेंगणा व अरुंद असल्यामुळे या पुलावरून आजवर अनेकांचा वाहन कोसळून बळी गेला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ठेंगणे व अरुंद पूल हे वाहतुकीसाठी ग्रामीण भागात नेहमीच अडचणीचे ठरलेले आहे.
साखरा बस थांब्यावर गतिरोधक उभारा
गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी मार्गावर भरधाव वाहतूक होत असल्याने साखरा येथील बसथांब्यावर गतिरोधक निर्माण करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. गतिरोधकाअभावी या ठिकाणी अनेकदा अपघात घडले आहेत.
चामोर्शीतील तलावाचे सौंदर्यीकरण करा
चामोर्शी : शहरालगत असलेल्या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. चामोर्शी शहरात फिरण्यासाठी व निवांत बसण्यासाठी प्रशस्त जागा नाही, त्यामुळे शहरातील तलावाचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.