चामोर्शीत नाली उपशाचे काम अपूर्ण राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 05:00 AM2020-06-02T05:00:00+5:302020-06-02T05:00:44+5:30
चामोर्शी शहरातील चौका-चौकात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे पडले आहेत. मोकाट जनावरे, कुत्री, डुक्कर सुद्धा गल्लोगल्ली फिरत असतात. या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शहरवासीयांकडून सातत्त्याने करण्यात येते. मात्र सदर समस्या मार्गी लावण्यासाठी नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने अद्यापही ठोस कार्यवाही एकदाही करण्यात आली नाही. परिणामी नागरिकांच्या तक्रारी बेदखलच असतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : पावसाळ्यापूर्वीची खबरदारी म्हणून चामोर्शी शहरातील नाल्यांमधील गाळाचा उपसा करून स्वच्छता करणे गरजेचे आहे. स्थानिक नगर पंचायत प्रशासनाने नाली उपशाचे काम उशिरा का होईना सुरू केले आहे. मात्र प्रशासनाने या कामासाठी केवळ १२ मजूर लावले असून त्यांच्यावर १७ प्रभागातील नाली स्वच्छतेची जबाबदारी आहे. पावसाचे पहिले नक्षत्र सुरू झाले असून पाऊस दोन ते तीन दिवसांत केव्हाही येऊ शकतो. परिणामी पावसापूर्वी नाली उपशाचे काम अपूर्ण राहण्याची शक्यता आहे.
चामोर्शी ही गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठी नगर पंचायत असून शहरात दाटीवाटीने वस्ती आहे. शहरात नाल्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाली उपशाचे काम पूर्ण करण्यासाठी पुरेशे मजूर व कामगार कामावर लावणे आवश्यक होते. मात्र नगर पंचायतीने अत्यल्प मनुष्यबळावर कमी कालावधी असताना नाली स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. एवढ्याशा मजुरांच्या भरवशावर पावसाळा उलटून जाईल तरीसुद्धा शहरातील सर्व नाल्यांची स्वच्छता होणे शक्य नाही.
चामोर्शी शहरात महिनोमहिने नाली नाली उपसली जात नसल्याने सर्व नाल्यांमध्ये प्रचंड घाण साचून आहे. पावसाळ्यात तर चामोर्शीवासीयांचे बेहाल होतात. दरवर्षी अनेकांच्या अंगणात व घरात नालीचे पाणी शिरत असते. साफसफाई व नाली उपशाचे कंत्राट दिलेल्या संबंधित संस्थेला पावसाळ्यापूर्वी अत्यल्प कालावधीत पूर्ण करणे शक्य नाही. दरवर्षी सदर कामाचे कंत्राट दिले जाते. अर्धवट काम करून बिल अदा करण्याचे काम या नगर पंचायतीत नित्यनेमाने केले जात आहे. परिणामी नालीची समस्या कायम राहते.
चामोर्शी शहरातील चौका-चौकात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे पडले आहेत. मोकाट जनावरे, कुत्री, डुक्कर सुद्धा गल्लोगल्ली फिरत असतात. या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शहरवासीयांकडून सातत्त्याने करण्यात येते. मात्र सदर समस्या मार्गी लावण्यासाठी नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने अद्यापही ठोस कार्यवाही एकदाही करण्यात आली नाही. परिणामी नागरिकांच्या तक्रारी बेदखलच असतात.
शहरात विविध समस्या कायम असतानाही पालिकेचे मुख्याधिकारी शहराच्या कोणत्याही वॉर्डात फेरफटका मारत नाही. समस्या जाणून घेताना दिसत नाही. यावरून त्यांना चामोर्शीवासीयांच्या समस्येबाबत काहीही देणेघेणे नसल्याचे दिसून येते. अंतर्गत रस्त्यांची पूर्णत: वाट लागली आहे. नगर पंचायतीच्या सभेत घेण्यात आलेल्या ठरावाची अंमलबजावणी केली जात नाही. कमिटीला विश्वासात घेतल्या जात नसल्याचे काही नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. विविध कामांचे कंत्राटसुद्धा मर्जीतील व्यक्तीलाच दिले जाते. चामोर्शी शहरात अनुभवी कंत्राटदार असतानासुद्धा शहर व तालुकाबाहेरच्या कंत्राटदाराला कामांचे कंत्राट देण्याचे गौडबंगाल काय असू शकते? असा प्रश्नही चामोर्शीकरांसमोर निर्माण झाला आहे. विविध कामांसाठी नगर पंचायतीला प्राप्त झालेला लाखो रूपयांचा निधी अखर्चित असल्याने तो परत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहर विकासाच्या दृष्टीकोनातून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी चामोर्शीवासीयांनी केली आहे.
अनियमित पाणी पुरवठ्यामुळे महिला त्रस्त
चामोर्शी नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने नळाद्वारे शहराच्या वॉर्डावॉर्डात पाणीपुरवठा केला जातो. कोट्यवधी रूपये खर्च करून नगर पंचायतीने नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीत दोष असल्याने शहरात अनियमित पाणी पुरवठा केला जातो. परिणामी महिला व नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. ८ ते १० दिवसाच्या अंतराने पाणी पुरवठ्याच्या मशीनमध्ये बिघाड निर्माण होऊन दुरूस्तीसाठी पुन्हा आठवडाभराचा कालावधी लागतो. त्यामुळे शहरवासीयांना बरेच दिवस नळाच्या पाण्यापासून वंचित राहावे लागते. मात्र पाणीपट्टी कर नळधारकांकडून जबरदस्तीने वसूल केला जातो. शहरातील वाढीव वस्त्यांमध्ये अद्यापही नळ पाईपलाईन टाकण्यात आली नाही.