अन् अपघातग्रस्तांना सोडून चालक रुग्णवाहिका घेऊन पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2021 01:10 PM2021-10-22T13:10:35+5:302021-10-22T13:27:39+5:30

गुरुवारी आरमोरीजवळील डोंगरगावाजवळ अपघातग्रस्त बाप-लेकाला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्याऐवजी चालकाने रुग्णवाहिकेसह पळ काढल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

The driver left the injured and fled in an ambulance | अन् अपघातग्रस्तांना सोडून चालक रुग्णवाहिका घेऊन पळाला

अन् अपघातग्रस्तांना सोडून चालक रुग्णवाहिका घेऊन पळाला

Next
ठळक मुद्देआरोग्य कर्मचाऱ्याच्या असंवेदनशीलतेवर शिवसेना पदाधिकारी संतप्त

गडचिरोली : अज्ञात वाहनाने कट मारल्यामुळे रस्त्यावर जखमी होऊन पडलेल्या बाप-लेकाला मार्गातील रुग्णालयात पोहोचवून देण्याची विनंती फेटाळत एका रुग्णवाहिका चालकाने पळ काढण्याचा प्रकार समोर आला आहे. आरमोरीजवळील डोंगरगावाजवळ गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला. त्या आरोग्य कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, दि. २१ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल व माजी उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम हे आपल्या चारचाकी वाहनाने गडचिरोलीकडे येत होते. यादरम्यान आरमोरीच्या अलीकडे गडचिरोली मार्गावर असलेल्या डोंगरगावाजवळ एक दुचाकी वाहन अपघातग्रस्त झाले. त्यात गडचिरोली तालुक्यातील गोगाव येथील नवीन मेश्राम व त्यांचा मुलगा जखमी झाले. गाडीने कट मारल्याने ते रस्त्यालगत जाऊन पडले होते. मुलाच्या डोक्याला जबर मार लागला होता. तेवढ्यात समोरून चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील मुडझा प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका गरोदर मातेला गडचिरोली येथे सोडून परत ब्रह्मपुरीकडे जात होती.

अपघातस्थळी जमलेल्या लोकांनी रुग्णवाहिकेला हात देऊन थांबविले. त्याचवेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल व अविनाश गेडाम हे जमाव बघून तिथे थांबले. रुग्णवाहिकेतून त्या जखमींना आरमोरीला उपचारासाठी सोडले जाईल, असे त्यांनाही वाटले. पण, चालक सुनील मारवाडे याने अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेत बसविण्यासाठी आणत असतानाच तेथून रुग्णवाहिकेसह पळ काढला. हा प्रकार सर्वांनाच आश्चर्यात टाकणारा होता. विशेष म्हणजे कोणतेही वेगळे परिश्रम घेण्याची गरज नसतानाही चालक असा वागला.

चालकाला शिवसेना स्टाईलने फटकारले

सदर आरोग्य कर्मचाऱ्याची असंवेदनशीलता पाहून जिल्हाप्रमुख चंदेल यांनी मोबाईलवरून आरमोरी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांना त्या रुग्णवाहिकेची माहिती दिली. त्यामुळे रुग्णवाहिका आरमोरीत थांबवून शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चालकाला चांगलेच फटकारले. दरम्यान, चंदेल यांनी स्वत:च्या चारचाकी वाहनाने अपघातग्रस्तांना आरमोरी रुग्णालयात उपचारासाठी नेऊन सोडले व उपचाराची विनंती केली. या प्रकाराची तक्रार चंद्रपूर जिल्हा आरोग्य अधिकारी गहलोत यांना करून त्यांनी त्या चालकाला निलंबित करण्याची मागणी केली आहे.

Web Title: The driver left the injured and fled in an ambulance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.